Hemant Godse Resign  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

MP Hemant Godse Resign : मराठा आरक्षणासाठी शिंदे गटाचा दुसरा राजीनामा; नाशिकच्या गोडसेंनी सोडली खासदारकी

Deepak Kulkarni

Nashik News : बीड, माजलगाव, सोलापूर, नगर, छत्रपती संभाजीनगरसह राज्यात ठिकठिकाणी मराठा आंदोलन चिघळलं आहे. मराठा समाजाच्या आंदोलकांनी राजकीय नेत्यांची कार्यालये, घरं, वाहनांची तोडफोड, जाळपोळ करण्यात येत आहे. मोर्चे, उपोषणं, निषेध आंदोलनं यामुळे वातावरण तापवलं आहे. अशातच शिंदे गटाचा दुसरा राजीनामा समोर आला आहे.

हिंगोलीचे खासदार हेमंत पाटलांनंतर आता नाशिकचे खासदार हेमंत गोडसेंनीही आपल्या खासदारकीचा राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे सुपूर्त केला आहे.

मराठा आरक्षणासाठी शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी राजीनामा दिला आहे. कालच हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील (hemant patil) यांनी आपला राजीनामा दिला होता. त्यांचा राजीनामा लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयाने स्वीकारला आहे.

याचदरम्यान, खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा पक्षाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिला आहे. आजच भाजपचे गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. आगामी काळात राजीनाम्याचे लोण वाढण्याची शक्यता आहे.

नाशिकमध्ये सुरू असलेल्या मराठा आंदोलनस्थळी खासदार हेमंत गोडसे यांनी भेट दिली होती. या वेळी मराठा आंदोलकांनी (Maratha Reservation) त्यांना घेराव घालत राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर काही वेळातच खासदार हेमंत गोडसे यांच्या राजीनाम्याचे पत्र व्हायरल झाले असून, त्यांनीदेखील मराठा आरक्षणाच्या मागणीवर आपला राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तसेच अनेक समाजाच्या राजकीय नेत्यांनी मराठा आरक्षण देताना इतर कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका शासनाकडे स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे जरांगे-पाटलांसह इतर सर्व नेत्यांबरोबर चर्चा करून मराठा आरक्षणाबाबत मार्ग काढावा लागेल, अन्यथा भागा-भागात, गावागावांत तसेच समाजा-समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता खासदार गोडसेंनी राजीनाम्यात केली आहे.

भुजबळांच्या घराची सुरक्षा वाढवली...

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळुंके(Prakash Solunke) यांचे घर मराठा समाजाच्या आंदोलकांनी जाळल्यानंतर आता राज्य सरकारचा गृहविभाग अलर्ट झाला. राज्य सरकारकडून ओबीसी नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या घराची सुरक्षा वाढवली आहे. दरम्यान, प्रकाश सोळुंके यांचे घर पेटविल्यानंतर राज्याचा गृहविभाग अलर्ट झाला आहे.

ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या घराची सुरक्षा राज्य सरकारकडून वाढविण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी भुजबळ यांनाही धमकीचे फोन आले होते. त्यामुळे भुजबळ यांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. भुजबळ यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या मुंबईतील बी-६ या बंगल्याची सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आलेली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT