Seema Hire  
उत्तर महाराष्ट्र

Seema Hire : पोलीस ठाण्यातच मजामस्तीतून गोळीबार, दोघे जखमी : तरी कारवाई नाही ; आमदार सीमा हिरेंनी विधिमंडळात उठवला आवाज

Seema Hire on Nashik Ambad Police Station Firing : नाशिकमधील अंबड पोलीस ठाण्यात झालेल्या गोळीबाराच्या घटनेची उच्चस्तरिय चौकशी करावी अशी मागणी आमदार सीमा हिरे यांनी केली आहे.

Ganesh Sonawane

Nashik Ambad Police Station Firing : नाशिक शहरातील अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजपूत यांनी मजामस्तीतून केलेल्या कथित गोळीबाराच्या घटनेला महिना उलटला तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने भाजपच्या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांनी विधिमंडळात जोरदार आवाज उठवत सदर घटनेची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी केली.

विधिमंडळात औचित्याचा मुद्दा मांडतांना आमदार सीमा हिरे म्हणाल्या की, नाशिकमधील अंबड या पोलिस ठाण्यात आपातकालीन किंवा कायदा व सुव्यवस्थेची कोणतीही परिस्थितीत नसताना पोलिस निरीक्षक राजपूत यांनी केवळ मजामस्ती म्हणून स्वत:च्या शासकीय पिस्तुलातून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

शासकीय नियमानुसार अशा प्रकारच्या कोणत्याही गोळीबारानंतर त्याची पोलिस स्टेशनच्या डायरीत नोंद करावी लागते किंवा तातडीने अहवाल देणे बंधनकारक असते. परंतु या घटनेला बरेच दिवस झाले तरीही संबधित अधिकाऱ्याने यावर मौन बाळगले आहे. या गोळीबारातून ट्रेनी पीएसआय साळुंके आणि दत्ता दिंढळे हे दोघेही जखमी झाले आहेत. या घटनेला महिना उलटला तरी राजपूत यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याची खंत सीमा हिरे यांनी व्यक्त केली.

याप्रकरणातील महत्वाचे पुरावे नष्ट करण्यासाठी पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज देखील गायब करण्यात आल्याचा संशय आमदार सीमा हिरे यांनी व्यक्त केला. सर्वसामन्य नागरिकांकडून किरकोळ चूक झाली तरी गुन्हे दाखल करुन कारवाई होते. परंतु स्वत:च्याच एका बेजाबदार अधिकाऱ्याला पाठिशी घातले जात आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी तातडीने उच्चस्तरीय समिती नेमून पोलिस निरीक्षक राजपूत यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी आमदार सीमा हिरे यांनी केली.

पोलिस निरीक्षक राजपूत यांनी अंबड पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारल्यापासून सिडको परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. हाणामाऱ्या, तोडफोड यासह गंभीर गुन्हे रोजच घडत आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांसोबत राजपूत यांची बोलीभाषा कायमच उर्मट असते. राजपूत यांच्या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्यांवर अन्याय होत आहे. यातूनच राजपूत यांच्या कार्यपध्दतीच्या विरोधात सिडकोवासियांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे आमदार हिरे यांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT