MLA Seema Hire & Dinkar Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik politics: पश्चिम मतदारसंघात भाजपच्या इच्छुकांची रांग, 'हे' आहे कारण!

Sampat Devgire

BJP News: नाशिक शहरात भाजपचे तीन आमदार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अनेक इच्छुक आहेत. मात्र सर्वाधिक इच्छुक नाशिक पश्चिम मतदारसंघात असल्याने तो चर्चेचा विषय आहे. या इच्छुकांची संख्या का वाढली याला वेगळेच कारण आहे.

सध्या समाज माध्यमे आणि शहरातील रिक्षांपासून तर फलकांपर्यंत नाशिक पश्चिम मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांची नावे झळकत आहेत. ही मोठी यादीच आहे. त्यामुळे गेले दोन टर्म भाजपकडे असलेल्या या मतदारसंघात एवढे इच्छुक आले कुठून? हा चर्चेचा विषय आहे.

या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाची बांधणी गेली अनेक वर्ष झालेली आहे. त्याचे मुख्य कारण जिल्ह्यातील `कसमादे` परिसरातील मतदारांची लक्षणीय संख्या. यापूर्वी भारतीय जनता पक्षाचे आमदार, माजी मंत्री (कै) डॉ डी. एस. आहेर नाशिक मतदार संघातून विजयी झाले आहेत.

माजी मंत्री (कै) डॉ. आहेर यांच्या विजयात या मतदारांचा मोठा वाटा होता. अद्यापही या मतदारसंघात लढत होते, ती प्रामुख्याने कसमादे आणि उत्तर महाराष्ट्रातील खानदेशी मतदारांशी संपर्क असलेल्या उमेदवारांतच.

या मतदारसंघातील विद्यमान आमदार सीमा हिरे यांना यंदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचे आव्हान असेल. हे दोन्ही उमेदवार जवळपास निश्चित मानले जातात. असे असले, तरीही भाजपचे अनेक इच्छुक पक्षाकडे उमेदवारीसाठी लॉबिंग करीत आहेत.

लोकसभा निवडणुकीत संधी हुकल्याने माजी सभागृहनेते दिनकर पाटील यांनी नेहमीप्रमाणे आपण इच्छुक असल्याचे संकेत दिले आहेत. याशिवाय निवृत्त अभियंता आणि माजी खासदार सुभाष भामरे यांचे बंधू दिलीप भामरे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्तीय अनिल जाधव, माजी नगरसेवक बाळासाहेब पाटील हे आहेत.

याशिवाय माजी नगरसेवक सतीश सोनवणे, राजेंद्र महाले, उद्योग आघाडीचे प्रदीप पेशकार, पक्षाचे शहर उपाध्यक्ष जगन पाटील, निमा संघटनेचे धनंजय बेळे आणि प्रवक्ते अजित चव्हाण अशी विविध नावे रांगेत आहेत.

या सर्व नेत्यांचे वरिष्ठ नेत्यांशी असलेले संबंध इच्छुक असण्याचे कारण आहे. हे संबंध म्हणजे उमेदवारी मिळण्याचे हमखास कारण, असे या इच्छुकांना वाटते. त्यामुळेच भारतीय जनता पक्षाची डोकेदुखी वाढली आहे.

या मतदारसंघात इच्छुकांची संख्या जास्त असणे, हे नवे नाही. यापूर्वीही भाजपचे अनेक नेते इच्छुक होते. त्यांनी उमेदवारीसाठी जोरदार लॉबिंग केली होती. त्यामुळे विद्यमान आमदार हिरे यांची डोकेदुखी दरवेळेस निवडणुकीच्या आधी वाढते.

शहरात सध्या या मतदारसंघात एवढे इच्छुक का? याची चर्चा सुरू आहे. त्याचे एक प्रमुख कारण म्हणजे, आमदार हिरे यांनी या मतदारसंघात व्यक्तिगत लाभाच्या अनेक योजना राबविल्या आहेत. दरवर्षी जवळपास सहा ते साडेसहा कोटी रुपयांचे अनुदान व्यक्तिगत लाभार्थ्यांना मिळते.

विविध सामाजिक घटकांची विकास कामांच्या माध्यमातून बांधणी, व्यक्तिगत संपर्क आणि विकास कामांच्या माध्यमातून आमदार हिरे यांचा मतदारसंघाच संपर्क आहे, असा त्यांचा दावा आहे. ती त्यांच्या जमिनीची बाजू आहे.

भारतीय जनता पक्षाला त्यामुळेच हा मतदारसंघ अनुकील वाटतो. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला तीस हजार मतांची आघाडी होती. यामुळे देखील इच्छुकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मात्र या सर्व घाई गडबडीत हे उमेदवार एकमेकांच्या पायात पाय घालतात की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.

विरोधी महाविकास आघाडीकडे मात्र शिवसेनेत जिल्हाप्रमुख बडगुजर हे एकमेव इच्छुक उमेदवार आहेत. त्यामुळे भाजपच्या या इच्छुकांना उमेदवारी जाहीर झाल्यावर प्रचारात सक्रिय करणे, हे मोठे आव्हान असेल. त्यामुळेच विद्यमान आमदार हिरे यांच्यावर इच्छुकांची मनधरणी करण्याचे अवघड काम असेल.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT