Shalarth ID scam : राज्यभर गाजत असलेल्या १६० कोटी रुपयांच्या शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात जळगाव जिल्ह्यातील जामनेरच्या शेंदुर्णी येथील शिक्षण संस्थेचा अध्यक्ष व भाजपचा पदाधिकारी संजय गरुड आणि संस्थेचा सहसचिव दीपक गरुड यांना शहर गुन्हे शाखेने अटक केली होती. दोघेही सध्या नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी जामिनासाठी अतिरिक्त सत्र न्यायालयात धाव घेतली असून अर्ज केला.
भाजपचा पदाधिकारी असलेल्या संजय गरुड यांच्या जामीन अर्जावर ३ ऑक्टोबरला, तर दीपक गरुड यांच्या अर्जावर ७ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. तसेच या प्रकरणातील मुख्य संशयित निवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी आणि माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर याच्या जामीन अर्जांवर नाशिक रोड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात सोमवारी (दि. २८) सुनावणी होणार आहे.
या प्रकरणात नितीन उपासनी हे ९ महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत आहे. वैद्यकीय कारणास्तव त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. कनिष्ठ न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळल्यावर त्यांनी अतिरिक्त सत्र न्यायालयात अर्ज केला. या अर्जावर सरकार पक्ष व बचाव पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाला होता. त्यानंतर अर्ज फेटाळण्यात आल्याने उपासनी यांचा कारागृहातील मुक्काम वाढला. आता त्यांनी पुन्हा जामिनासाठी अर्ज केला आहे. धुळे येथून अटक करण्यात आलेला जळगावचा माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यानेही जामिनासाठी अर्ज केला. बनावट शालार्थ आयडीच्या प्रस्तावांना गैरमार्गाने मंजुरी दिल्याचे तपासात समोर आले आहे.
नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेच्या विशेष पथकाकडून शालार्थ आयडी घोटाळ्याचा तपास केला जात आहे. या प्रकरणात सुमारे १२४ प्रकरणांमध्ये अधिकृत नोंदी आणि प्रत्यक्ष डेटामध्ये विसंगती आढळली असून, एकाच जावक क्रमांकावर विविध नावांचे आदेश जारी झाल्याचे तपासात समोर आले आहे. नाशिक विभागातील ८४१ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी बनावट असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यापैकी ६३८ कर्मचारी जळगाव जिल्ह्यातील आहेत.
या प्रकरणात आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे, ज्यामध्ये भाजप पदाधिकारी संजय गरुड यांच्यासह दीपक गरुड, नितीन उपासनी, किरण पाटील, राहुल पवार, शिक्षण संस्थाचालक व मध्यस्थ प्रशांत वाडिले, शशिकांत हिंगोणेकर आणि लॅब असिस्टंट तुषार साळुंके यांचा समावेश आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.