

Maharashtra drought declaration : राज्य सरकारने राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारने विविध सवलती व उपाययोजना लागू केल्या आहेत. या निर्णयावरुन आता श्रेय वाद सुरु झाला असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पत्रामुळेच सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर केला, असा दावा आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे. दुष्काळाच्या मुद्द्यावर शरद पवार यांचा उल्लेख होत असताना मंत्री गिरीश महाजन यांनी त्यावर भाष्य केलं. महाजनांनी शरद पवार यांच्यावर कोणतीही टीका न करता शशिकांत शिंदे यांच्या विधानाचा समाचार घेतला.
शरद पवार यांनी पत्र पाठवल्यानंतर सरकारने जीआर काढून दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेतला, असा दावा केला जात असल्याबाबत पत्रकारांनी महाजन यांना विचारणा केली. त्यावर महाजन यांनी शरद पवार यांच्याबाबत थेट भाष्य करण्याचे टाळत त्यांच्या ज्येष्ठतेचा दाखला दिला. शरद पवार साहेब जेष्ठ नेते आहेत. ते देशाचे कृषिमंत्री राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल मला काही बोलायचे नाही असे म्हणत महाजनांनी टीका करणे टाळले.
त्यानंतर महाजन यांनी शशिकांत शिंदे यांच्या विधानाचा मात्र समाचार घेतला. लोक बिचारे रडत आहेत. त्यांची अवस्था प्रचंड वाईट आहे. अशात श्रेयवादाची लढाई करणं योग्य नाही, कुणी इतके बालिश विधान करू नये असा टोला महाजन यांनी लगावला.
दुष्काळ जाहीर करण्यामागे कोणाच्या निवेदनाचा परिणाम आहे, यापेक्षा सध्या संकटात असलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केलं. शरद पवार यांच्यावर कोणतीही टीका न करता त्यांच्या नावाचा आधार घेत दुष्काळाच्या निर्णयाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना महाजनांनी आपल्या बोलण्यातून लक्ष्य केलं.
दुष्काळ जाहीर करण्याच्या प्रक्रियेवर महाजन म्हणाले, गेल्यावेळी देखील अतिवृष्टी झाली त्यावेळी एनडीआरएफ'च्या निकषापेक्षा जास्त मदत सरकारने केली होती. याहीवेळेला एनडीआरएफ'च्या निकषाप्रमाणे हा दुष्काळ ऑक्टोबरमध्ये जाहीर होणे अपेक्षित होते. पण आपण त्याची वाट बघितली नाही, त्याच्या आधीच दुष्काळ जाहीर केल्याचं महाजनांनी स्पष्ट केलं.
दरम्यान गिरीश महाजन यांनी त्यांच्या जामनेर तालुक्यातील शेतांची पाहणी केली. पावसाच्या खंडामुळे झालेल्या पीकहानीची स्थिती जाणून घेतली. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने विविध उपाययोजनांचे नियोजन केले असून ट्रिगर-१ नुसार संबंधित सर्व शेतकऱ्यांना मदत देण्याची सरकारची भावना असल्याचे महाजन यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.