Ahilyanagar Political News : अहिल्यानगर जिल्ह्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री तथा मुळा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव गडाख यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम देत मोठे राजकीय विधान केले आहे.
सत्ता असलेल्या पक्षात जाण्यासाठी अनेकांनी उड्या मारल्या. पण मी कोणत्याही परिस्थितीत संधीसाधूपणा करणार नाही. संकटांशी लढणे माझ्या रक्तात आहे. शेतकरी आणि सहकाराच्या प्रश्नांसाठी संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
मुळा एज्युकेशन संस्थेच्या आंबराई प्रांगणात आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना गडाख (Shankarrao Gadakh) यांनी सध्याच्या राजकीय पक्षांतराच्या प्रवाहावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील राजकीय संघर्ष सुरू असताना विरोधी पक्षांतील अनेक नेते सत्ताधारी गटाच्या जवळ जात असल्याचे चित्र दिसत आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करत त्यांनी हे वक्तव्य केले.
यावेळी ज्येष्ठ नेते विश्वासराव गडाख, नानासाहेब रेपाळे, बाजार समितीचे अध्यक्ष नंदकुमार पाटील, खरेदी-विक्री संघाचे प्रभाकर कोलते, कारभारी जावळे, भाऊसाहेब निमसे आदी उपस्थित होते. यावेळी आश्रुबा सानप, राजेंद्र टेमक, जालिंदर येळवंडे, मुकुंद भोगे आणि बाबा घुले यांनीही शेतकऱ्यांच्या (Farmer) समस्या मांडत राज्य व केंद्र सरकारसह स्थानिक विरोधकांवर जोरदार टीका केली.
आपल्या भाषणात गडाख यांनी मुळा कारखान्याच्या वाटचालीचा आढावा घेताना, ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांनी रुजवलेली सहकाराची परंपरा जपण्याचा निर्धार व्यक्त केला. कारखान्यात वीज निर्मिती, इथेनॉल प्रकल्प आणि विविध विस्तार योजनांची अंमलबजावणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, ऊस क्षेत्रात झालेली घट ही कारखान्यासमोरील मोठी अडचण ठरत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुळा कारखान्याच्या आर्थिक आणि प्रशासकीय अडचणींबाबत सविस्तर भूमिका मांडल्यानंतर गडाख यांनी पाटपाणी प्रश्नावरही भाष्य केले. नेवासे तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांकडून धरणातील पाण्याचे योग्य नियोजन होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या पाण्याच्या हक्कासाठी भविष्यात संघर्ष उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला.
राज्यातील साखर उद्योगाच्या स्थितीवर बोलताना गडाख यांनी संगमनेर आणि कोळपेवाडी कारखान्यांचा अपवाद वगळता बहुतांश साखर कारखाने अडचणीत असल्याचा दावा केला. आकडेवारीसह परिस्थिती मांडताना त्यांनी सहकार क्षेत्र वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.
अहिल्यानगर जिल्ह्यात भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलेल्या वातावरणात, शंकरराव गडाख यांनी केलेले वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. सत्ता मिळवण्यासाठी पक्षांतर नाही, तर शेतकऱ्यांसाठी संघर्ष, हा संदेश देत त्यांनी आगामी राजकीय घडामोडींसाठीही संकेत दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.