

Krantikari Shetkari Party Newasa : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसला आहे. अहिल्यानगरमधील माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी त्यांच्या नेवासा मतदारसंघात, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाची 'मशाल' खाली ठेवली आहे. गडाख यांनी त्यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या नगरपंचायतीच्या निवडणुकीला समोरे जाण्याचं ठरवलं आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात नेवासात एकमेव नगरपंचायत आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेची निवडणूक देखील क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून लढवली जाणार असल्याचे संकेत दिले आहेत. या निर्णयाबरोबर शंकरराव गडाख यांनी शिवसेना ठाकरे सेना पक्षाला 'जय महाराष्ट्र' केल्याचे सांगितले जात आहे.
नगरपालिका, नगरपंचायत आणि नगरपरिषदेसाठी आजपासून निवडणुकीचा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात महायुती अन् महाविकास आघाडी (MVA) अजून जाहीर झालेली नाही. परंतु राजकीय धुरळा मात्र जोरात उडू लागला आहे. यातच वेगवेगळे धक्कादायक राजकीय निर्णय होताना दिसत आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षातील माजी मंत्री शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. नेवासा तालुक्यात त्यांनी नगरपंचायत निवडणूक क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. गडाख यांनी 2017 मध्ये अपक्ष असताना क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ असताना, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी अपक्ष वाटचाल सुरू केली होती. शंकरराव गडाख विधानसभा निवडणुकीत विजय झाल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला. महाविकास आघाडी सरकारमध्ये शंकरराव गडाख यांना मंत्रिपद देखील मिळाले. यानंतर शिवसेना बंडाळी झाली.
एकनाथ शिंदे यांनी बंडाळी करून वेगळा गट स्थापन केला. यानंतरही शंकरराव गडाख यांनी उद्धव ठाकरे यांची साथ कायम ठेवली. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांनी मशाल खाली ठेवत, त्यांचा क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
शंकरराव गडाख आणि त्यांच्या समर्थकांची रविवारी बैठक झाली. मुळा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुंवर, अॅड. अण्णासाहेब अंबाडे, अण्णासाहेब पठारे आदी उपस्थित होते. समर्थकांनी गडाखांच्या नेतृत्वात नगरपंचायतीच्या सर्व जागांवर विजय मिळवण्याचा निर्धार केला.
माजी मंत्री शंकरराव गडाख म्हणाले, "आगामी नगरपंचायत निवडणूक क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून लढविण्यात येईल. ही लढाई कोणती व्यक्ती किंवा पक्षाविरोधात नाही. नेवासा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आहे. सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने शिस्तबद्ध काम करून नगराध्यक्षासह नगरसेवक पदावर जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणावेत." नव्या जोमाने आणि विकासाच्या हेतूने क्रांतिकारी शेतकरी पक्ष निवडणुकीत उतरणार असल्याचे गडाख यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.