Nagar News : राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन पुढच्या महिन्यात डिसेंबरला नागपूरमध्ये होत आहे. देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. राज्य सरकारच्या या अधिवेशनाच्या निमित्ताने देशात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. भाजप महायुतीचे राज्यातील सरकार त्या अनुषंगाने विविध घोषणा करण्याच्या तयारीत आहे. महाविकास आघाडीदेखील विरोधक म्हणून तयारीतच आहे. 'हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट एकत्र येईल. यातच आगामी लोकसभेची रणनीती ठरवली जाईल', असे शिवसेनेचे माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.
माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख Shankarrao Gadakh म्हणाले, "राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे डिसेंबरमध्ये होत आहे. या अधिवेशनासाठी शिवसेना ठाकरे गट एकत्र असून, लढाईची रणनीती ठरलीय. परंतु त्यावर मी अधिक भाष्य करणार नाही. अधिवेशनासाठी शिवसेना ठाकरे गट एकत्र असून, या वेळी लोकसभेच्या अनुषंगाने काही महत्त्वपूर्ण निर्णय होतील. त्यानुसार पुढची वाटचाल राहील. जेव्हा काम सुरू होईल, तेव्हा सर्व चित्र स्पष्ट दिसेल". नगर जिल्ह्यातील नगर दक्षिण लोकसभेबाबतदेखील शिवसेनेचा ठाकरे गटात चर्चा आहे. निर्णय ज्यापद्धतीने होईल, त्यापद्धतीने काम करू, असेही आमदार गडाख यांनी सांगितले.
देशात 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. भाजपकडून निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. इंडिया महाविकास आघाडीदेखील निवडणुकीचा अजेंडा तयार करण्यात गुंतली आहे. देशात सध्या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचे रणधुमाळी सुरू आहे. यात निवडणुकांद्वारे भाजप आणि इंडिया महाविकास आघाडी लोकसभेची चाचपणी करतेय. भाजप (BJP) आणि इंडिया महाविकास आघाडीकडून (mahavikas aghadi) सर्व्हे घेतले जात आहेत. त्या अनुषंगाने दोन्ही बाजूने रणनीती आखली जाते आहे. भाजप आणि इंडिया महाविकास आघाडीचे महाराष्ट्रातील जागांवर विशेष लक्ष आहे. महाराष्ट्रात लोकसभेसाठी 48 जागा आहे. भाजपने येथे 45 प्लसचे टार्गेट ठेवलेय. इंडिया महाविकास आघाडीनेदेखील जोर लावला आहे. परंतु महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरतेमुळे सर्वच पक्ष 'सावकाश', अशा भूमिकेत दिसत आहेत.
राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादीत (NCP) बंड झाले. बंडाळी करणारे भाजप महायुती बरोबर जाऊन राज्यात सत्तेत बसले. यातच राज्यात मराठा आरक्षणाचा पेच निर्माण झाला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील राज्यभर दौरे करत आहे. दुसरीकडे ओबीसी नेते मराठा समाजाला आरक्षण द्या, पण ओबीसीतून नको, अशी भूमिका घेऊन संघर्षासाठी मैदानात उतरले आहेत.
या सर्व राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर राज्यात लोकसभा निवडणुकांना सामोरे जाताना सर्व पक्षांना जिकिरीचे होणार आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे दोन्ही गट तसेच इतर पक्षांनी राज्यातील हिवाळी अधिवेशनाबरोबर लोकसभेची रणनीती आखण्याची तयारी सुरू केला आहे. यामुळे हे हिवाळी अधिवेशन खास ठरणार, हे मात्र निश्चित!
Edited by : Rashmi Mane