Nashik Politics : नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपचे ७२ नगरसेवक निवडून आले आहेत. एकीकडे भाजपची एकहाती सत्ता आली असल्याने सगळे अगदी निवडून आलेले नगरसेवक, कार्यकर्ते आनंद साजरा करत असतानाच एक धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे.
निवडणुकीत पराभूत झाल्याच्या रागातून भाजपचे विजयी उमेदवार शरद मोरे यांच्यावर काही हल्लेखोरांनी हत्याराने हल्ला केला. हे हल्लेखोर मोरे यांना शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने गेले व त्यांना मारहाण करत त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना पिस्तूल दाखवून धमकावले. तसेच ५० लाख रुपये खंडणीची मागणी केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या जेलरोड परिसरात घडली.
याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ तपास करत अनुराग सागवान, यश गरूड, दीपक सदाफळे, विजयसिंह या चौघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान ज्यांच्यावर हल्ला झाला ते भाजपचे विद्यमान नगरसेवक शरद मोरे यांनी यासंदर्भात पोलिसांना संपूर्ण माहिती दिली. शरद मोरे यांच्या वतीने गीता चिंतामण मोरे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
मोरे यांनी दिलेल्या माहिती अशी की, माजी नगरसेवक पवन पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांना प्रभाग क्रंमाक १८ मधून शिवसेना शिंदे गटाने उमेदवारी दिली होती. आशा पवार यांच्याविरोधात भाजपकडून शरद मोरे हे निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, आजारी असतानाही मोरे यांनी प्रचार करत चुरशीच्या झालेल्या लढतीत आशा पवार यांचा पराभव केला.
निवडून आल्यानंतर शुक्रवारी (दि. १६, जानेवारी) रात्रीच्या सुमारास शरद मोरे हे शुभेच्छा स्वीकारण्यासाठी घराबाहेर बसलेले होते. त्या दरम्यान त्यांना शुभेच्छा देण्याच्या बहाण्याने हल्लेखोर तिथे आले. त्यांनी हातातील हत्याराने मोरे यांच्यावर वार करत त्यांना दुखापत केली.
निवडणुकीत आमचा ५० लाख रुपये खर्च झाला आहे. तो परत द्या, अशी धमकी दिली. त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन ओढली. यावेळी गीता यांनी मोरे यांना वाचवण्यासाठी मध्यस्ती केली. तेव्हा त्यांनाही मारहाण करुन धारधार शस्राने हाताला दुखापत केली. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्याचे पथक उर्वरित संशियतांचा शोध घेत आहे.
पराभूत झाल्याच्या रागातून पवन पवारच्या गटाकडून मोरे यांच्यावर हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. दरम्यान या घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी करत असून पोलिसांनी अटक केलेल्या चारजणांबरोबरच बंटी काळे, किरण गाटोळे, शुभम आदमाने, भुऱ्या खेडकर, प्रशांत सदाफळे, पवन पवार व विशाल पवार यांच्यावर दरोडा, जीवे मारण्याचा प्रयत्न, खंडणीची मागणी या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.