

Nashik Politics : नाशिक महापालिकेत कोणत्याही परिस्थितीत भाजपला सत्ता आणायची होती. त्यानुसार भाजपने 72 जागा जिंकत पुन्हा एकदा महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्यामुळे आता नाशिक महापालिकेत भाजपचा महापौर बसणार आहे हे स्पष्ट झालं आहे.
भाजपचे संकटमोचक, मंत्री व निवडणूक प्रभारी असलेल्या गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये शंभर प्लसचा नारा दिला होता. काहीही करुन नाशिकमध्ये सत्ता आणायचीच असा निर्धार त्यांनी केला होता. त्यासाठी त्यांनी विरोधी पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिले. अगदी शहरातील आमदारांचा विरोध झुगारुन प्रवेश दिले. त्यातीलच एक नाव म्हणजे सुधाकर बडगुजर होय. त्याच बडगुजर यांनी महापालिका निवडणुकीत एक नवा इतिहास रचला आहे.
सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला सर्वाधिक विरोध झाला होता. बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला भाजप आमदार सीमा हिरे यांनी तीव्र विरोध केला होता. त्यावेळी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्तासोबतचा बडगुजर यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. अनेक गुन्हेगारी घटनांमध्येही बडगुजर यांच्यावर आरोप असून कुख्यात गुंड सलीम कुत्ता सोबत त्यांचा संबंध जोडण्यात आला होता. पण दुसरीकडे त्यांच्यावरील आरोप सिद्ध झालेले नव्हते तसेच बडगुजर यांनी देखील हे आरोप फेटाळले होते.
बडगुजर हे त्यांच्या प्रभागातील मात्तबर नेते होते. नाशिक महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन मंत्री गिरीश महाजन यांनी आमदार सीमा हिरे व स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध झुगारुन त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला. बडगुजर यांच्या भाजपप्रवेशाने शिवसेना ठाकरे गटाला मोठा हादरा बसला होता. त्यानंतर पालिका निवडणुकीत सुधाकर बडगुजर यांच्यासह त्यांचा मुलगा दीपक बडगुजर या दोघांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली.
बडगुजर यांच्या मुलाचा निवडणुकीत पराभव झाला असला तरी सुधाकर बडगुजर हे मात्र दणदणीत मतांनी विजयी झाले. नाशिक महापालिका निवडणुकीच्या रिंगणातील ७३५ उमेदवारांमध्ये भाजपचे प्रभाग क्रमांक २५ मधील उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी सर्वाधिक १४ हजार ८६४ मतांच्या फरकाने विजय मिळवित पुन्हा एकदा इतिहास रचला. २०१७ च्या निवडणुकीतही बडगुजर हेच सर्वाधिक मतांनी विजयी झालेले उमेदवार ठरले होते.
सर्वाधिक मतांच्या फरकाने विजयी झालेल्या नगरसेवकांमध्ये सुधाकर बडगुजर यांच्या पाठोपाठ प्रभाग १ मधील भाजपच्या गणेश गिते यांच्या पत्नी दीपाली गिते या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. महिलांमध्ये सर्वाधिक मताधिक्य दिपाली गिते यांना आहे. तब्बल ११,३१५ एवढ्या विक्रमी मताधिक्याने त्यांनी विजय संपादन केला आहे. तर प्रभाग ९ मधील दिनकर पाटील हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. दिनकर पाटील हे तब्बल ९,४४३ मताधिक्याने निवडून आले. गौरव गोवर्धने चौथ्या स्थानावर आहेत ते ९,०१८ मताधिक्यांनी तर ऐश्वर्या लाड-जेजूरकर या पाचव्या स्थानावर ८,९१० मताधिक्यांनी विजयी झाल्या.
सर्वात कमी मतांनी पडले....
तर, सर्वात कमी मतांनी पडलेल्या उमेदवारांमध्ये प्रभाग २८ मधील शिवसेनेच्या उमेदवार आणि माजी नगरसेवक शीतल भामरे यांचा समावेश आहे. भामरे यांचा फक्त १८० मतांच्या फरकाने पराभव झाला. प्रभाग ८ मधून प्रवीण पाटील यांना २८४ मते कमी मिळाल्याने त्यांचाही पराभव झाला.
सर्वात तरुण नगरसेवक
भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविलेल्या ऐश्वर्या लाड जेजुरकर यांनी तब्बल ९ हजार मतांचे निर्णायक आघाडी घेत त्यांनी प्रतिस्पर्ध्यांचा दणदणीत पराभव केला असून, नाशिक महानगरपालिकेतील २८ वर्ष वय असलेल्या सर्वात तरुण नगरसेवक म्हणून त्यांचा सन्मानाने उल्लेख होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.