Ladki Bahin Yojana; Devendra Fadnavis and NCP SP Rohini Khadse  sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : 92 लाख लाडक्या बहिणी अपात्र : शरद पवारांच्या महिला नेत्याला आली अजितदादांची आठवण; सरकारला डिवचत थेट सुनेत्रा पवारांना आवाहन

Rohini Khadse criticizes Mahayuti Government Over Ladki Bahin Yojana 92 Lakh Beneficiaries Reduction : राज्यातील लाडकी बहीण योजनेतून पुन्हा एकदा लाखोंच्या संख्येनं महिलांना अपात्र करण्यात आले आहे.

Aslam Shanedivan

Jalgaon News : राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेत येण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून तब्बल 92 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. यावरून आता नवा वाद सुरू झाला असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच निशाणा करत, “काय ओ भाऊराया, वहिनींचे हट्ट... मग आता लाडक्या बहिणीच नको का झाल्या?” असा सवाल केला आहे.

राज्यात एकीकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे कॅगने राज्य सरकारवर ताशेरे ओढले होते. कॅगने आपल्या अहवालात या योजनेवर खर्च झालेल्या ३,५४२ कोटी रुपयांचे ठोस समर्थन करता येत नसल्याचे म्हटले होते. ज्यानंतर काँग्रेसने या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप केला होता.

दरम्यान, गेल्या महिन्यापासून या योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या कमी होताना दिसत आहे. गेल्या महिन्यात सरकारने ई-केवायसी न करणे, उत्पन्नाची मर्यादा आणि योजनेच्या पात्रतेसाठी असलेले वय ओलांडणे अशी कारणे दाखवत तब्बल 80 लाख लाभार्थी अपात्र ठरवले होते. आता यात आणखी भर पडली असून ती तब्बल 92 लाखांवर गेली आहे.

आता लाभार्थी महिलांच्या पात्रतेवरून रोहिणी खडसे यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. याबाबत त्यांनी आपल्या 'एक्स' या समाजमाध्यमावर एक पोस्ट केली आहे. तर या पोस्टमध्ये त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारला थेट सवाल केले आहेत.

रोहिणी खडसे यांनी या पोस्टमध्ये, "काही महिन्यांपूर्वी ८० लाखांपेक्षा अधिक महिला लाडकी बहीण योजनेतून बाद करण्यात आल्या होत्या. आता महिन्याभराने आणखी १२ लाख लाडक्या बहिणींना बाद करण्यात आल्या आहेत. असं करून सरकारने तब्बल ९२ लाख महिलांना अपात्र केलं. सरकारमधील लोक सांगतात की, लाडक्या बहिणींचा खर्च २६ हजार १९७.७८ कोटींवरून ३३ हजार ६९७ कोटींवर गेला आहे. लाडक्या बहिणींवर ७,५०० कोटींचा खर्च वाढला आहे.

मग काय ओ भाऊराया, @CMOMaharashtra, @mieknathshinde, आता तुम्हाला लाडक्या बहिणींचा खर्च दिसतोय का? आता तुम्हाला लाडक्या बहिणी 'जड' झाल्यात का? वहिनींचे सगळे हट्ट, सगळे लाड पुरवता, मग तुम्हाला आता लाडक्या बहिणीच नको झाल्यात का?" असा उपरोधिक सवाल केला आहे. तसेच सरकारने लाडक्या बहिणींच्या संख्येवर चालवलेल्या कात्रीवरून नाराजी व्यक्त केली आहे.

लाडक्या बहिणींचा ‘दादा’ आता नाही

लाडक्या बहिणींचा खंबीर 'दादा' आता नाही, पण किमान सुनेत्रा वहिनी, तुम्ही तरी लाडक्या बहिणींवर होणारा अन्याय मांडावा, असे आवाहनदेखील रोहिणी खडसे यांनी या पोस्टमध्ये केले आहे. तसेच रोहिणी खडसे यांनी, निवडणुकीच्या काळात महिलांना आर्थिक आधार देण्याचे आश्वासन देत ‘लाडकी बहीण’ योजनेचा मोठा गाजावाजा केला होता. मात्र, आता सत्ता येताच लाभार्थ्यांची संख्या सातत्याने कमी करण्याचे काम हे सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT