Sharad Pawar Nitin Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

NCP Ajit Pawar Group : शरद पवारांच्या राजकीय डावाने आमदार नितीन पवारांचे वाढले टेन्शन!

NCP Politics : महाविकास आघाडीत नवा भिडू घेऊन अजित पवार गटात गेलेल्या नितीन पवार यांची कोंडी करण्याचा डाव.

Sampat Devgire

Nashik News : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत सीपीएम समाविष्ट होण्याची शक्यता आहे. तसे संकेत पक्षाच्या नेत्यांनी दिले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात गेलेल्या कळवणचे आमदार नितीन पवार यांचे टेन्शन वाढण्याची चिन्हे आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील सर्व सहा आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेले. या बंडखोर आमदारांची त्यांच्याच मतदारसंघात राजकीय कोंडी करण्याचे संकेत शरद पवार यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. या राजकीय डावपेचांचा भाग म्हणून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात महाविकास आघाडीची मजबूत बांधणी करण्याचे धोरण आखण्यात आले आहे. यामध्ये शरद पवार यांचा महत्त्वाचा वाटा आहे. धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी टाळण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला या आघाडीत समाविष्ट करून घेण्याची शक्यता आहे. 'सीपीएम' पक्षाला राज्यात दोन ते तीन जागा सोडण्यात येऊ शकतात. यामध्ये पालघर आणि नाशिक जिल्ह्याचा समावेश आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सुरगाणा-कळवण विधानसभा मतदारसंघ 'सीपीएम'चा बालेकिल्ला राहिला आहे. या पक्षाचे नेते जे. पी. गावित (Jiva Pandu Gavit) येथून सलग सात वेळा आमदार झाले आहेत. गेल्या निवडणुकीतदेखील त्यांनी काँग्रेस (Congress) आघाडीला झुंजवले होते. या पक्षाला महाविकास आघाडीत प्रवेश दिल्यास राष्ट्रवादीतून (NCP) बंडखोरी केलेल्या आमदार नितीन पवार यांचे टेन्शन वाढणार हे नक्की.

विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेत पूर्वीच्या सुरगाणा मतदारसंघातील पेठ भाग दिंडोरीला तर हरसुल भाग इगतपुरीला जोडण्यात आला. हे तिन्ही परिसर आदिवासीबहुल असून माकपचे बालेकिल्ले राहिले आहेत. शरद पवार यांनी टाकलेल्या नव्या राजकीय डावात ते एकाच फटक्यात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि नितीन पवार या अजित पवार गटात गेलेल्या आमदारांची राजकीय नाकेबंदी करणार, हे स्पष्ट झाले आहे.

2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत कळवण-सुरगाणा मतदारसंघातून काँग्रेस आघाडीचे नितीन पवार 86 हजार 877 मते घेऊन 6 हजार 596 मतांनी विजयी झाले होते. सीपीएमचे जे. पी. गावित यांनी स्वबळावर 80 हजार 281 मते मिळवली होती. शिवसेना-भाजप युतीचे मोहन गांगुर्डे (शिवसेना) हे 23 हजार 052 मते घेऊन तिसऱ्या स्थानावर होते. शरद पवार यांनी महाविकास आघाडीची उमेदवारी गावित यांना दिल्यास त्यांना शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाची मदत होणार आहे. अशा परिस्थितीत गावित यांची वाट विधानसभेसाठी सुकर होईल. त्यामुळे अजित पवार गटाचे नितीन पवार यांची डोकेदुखी वाढणार हे निश्चित.

Edited By : Rashmi Mane

R...

SCROLL FOR NEXT