Ahmednagar Politics : आमदारांच्या संघर्षात प्रशासकीय अधिकाऱ्यांचे कर्जत-जामखेड, नको रे बाबा !

Rohit Pawar VS Ram Shinde: आमदार रोहित पवार आणि आमदार राम शिंदे यांच्या राजकीय संघर्षामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली...
Rohit Pawar VS Ram Shinde
Rohit Pawar VS Ram ShindeSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : कर्जत-जामखेडमध्ये राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांच्या राजकीय संघर्षामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. काही करा, पण कर्जत-जामखेड नको, असे नव्याने येणारे अधिकारी म्हणत असल्याने महत्त्वाच्या पदाला प्रभारी अधिकाऱ्यांना कारभार हाकावा लागत आहे. त्यातच दोन महसूलच्या अधिकाऱ्यांच्या निलंबनाने तर अनेकांची पाचावर धारण बसली आहे. काही विभागांत फक्त पाट्या टाकण्याचेच काम प्रमुख अधिकारी करीत आहेत. मात्र याचे नुकसान सर्वसामान्य नागरिकांना भोगावे लागत आहे.

कर्जत-जामखेड मतदारसंघ सध्या राज्यात चर्चिला जात आहे. येथील दोन्ही लोकप्रतिनिधींच्या राजकीय संघर्षाने कधी-कधी टोकाची भूमिका कार्यकर्ते घेताना दिसतात. आमदार रोहित पवार यांनी महाविकास आघाडी सरकार असताना एखाद्या मंत्र्याला लाजवेल अशा विकासकामांचा धडाका लावला. आपल्या मर्जीतील अधिकारी घेत मतदारसंघात विरोधी आमदार असणाऱ्या माजी पालकमंत्री राम शिंदेंना येन-केन-प्रकारेन विषयावर बॅकफूटला ढकलण्याचा पुरेपूर सपाटा लावला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rohit Pawar VS Ram Shinde
Maratha Reservation : 55 लाख कुणबी नोंदी सापडल्या मग दाखला का नाही? मनोज जरांगेंनी...

यातच त्यांचे शिलेदार फोडून आपल्या राष्ट्रवादीत सामील करीत एकाकीदेखील पाडत राहिले. कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीत रोहित पवार यांनी भाजपच्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज माघारी किंवा पाठिंबा घेण्याची जी खेळी केली ती राज्यासह मतदारसंघातदेखील नव्याने पाहावयास मिळाली. मात्र तीच खेळी काही काळानंतर त्यांच्याच अंगलटदेखील आली, हे सत्य नाकारून जमणार नाही.

राम शिंदेंनी कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीत रोहित पवार सत्तेचे दबावतंत्र वापरून अधिकाऱ्यांना घरच्या नोकराप्रमाणे वागवत असल्याची टीका करीत ग्रामदैवत संत सद्गुरु गोदड महाराजांच्या मंदिरात मौनव्रत धारण करून भाजपच्या राज्यातील वरिष्ठ नेतृत्वाचे आपल्याकडे लक्ष वेधले.

पवार घराण्यातील अभ्यासू आणि भविष्यातील राज्याच्या उगवत्या नेतृत्वाला थोपवायचे असेल तर राम शिंदेंना पाठबळ द्यावेच लागेल. याचअनुषंगाने महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांना डावलत राम शिंदेंना विधान परिषदेवर संधी दिली. राम शिंदेंचे नशीब चांगले त्यांच्या आमदारकीबरोबर राज्यात सत्तांतर घडत भाजप महायुतीचे सरकार आले.

बदला घेणार नाही, ते राम शिंदे कसले!

विधानसभेच्या पराभवानंतर अडीच वर्षांत मतदारसंघात राम शिंदेंना अनेक ठिकाणी दुय्यम वागणूक मिळाली. पवारांच्या मर्जीतील प्रशासकीय अधिकाऱ्यांनीदेखील त्यांना वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या. तरी राम शिंदे यांनी शांतपणा आणि संयम दाखवला. आमदारकीनंतर कोणाला बदली देत तर कोणाला मला तुम्ही नको, असे म्हणत कार्यपद्धतीचा हिसका दाखवला, तर महसूल विभागाचे प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना तर निलंबनाला सामोरे जावे लागले. निलंबनाला अवैध गौणखनिज मुद्दा असला तरी त्याला शिंदे-पवार राजकीय संघर्षाची झालर अधिक होती.

निलंबनानंतर अधिकारी-कर्मचारी बॅकफूटवर

महसूलच्या दोन अधिकाऱ्यांच्या निलंबनानंतर इतर अधिकाऱ्यांनी आपली पहिली कार्यपद्धती बदलली. सर्वसामान्य जनतेची कामे घरून, तर काही कामे चला पुढच्या ओढ्यात असे म्हणून कार्यकाळ पूर्ण करण्याचा सपाटा लावला.

दोन्ही आमदारांच्या राजकीय संघर्षात आमचे वाटोळे नको, म्हणून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना सांभाळण्यातच त्यांची नोकरी चालू झाली. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आता अधिकाऱ्यांच्या बदलीचे सत्र चालू झाले आहे. यात अनेक अधिकारी बदलीस पात्र आहेत. पण त्यांच्या जागी कोणीच यायला तयार नाही, ही या मतदारसंघाची शोकांतिका म्हणावी लागेल.

(Edited By- Ganesh Thombare)

R...

Rohit Pawar VS Ram Shinde
MIM in Ahmednagar : लोकसभेच्या रिंगणात MIM ची एन्ट्री? कुणाची डोकेदुखी वाढणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com