Saroj Ahire & Laxman Mandale Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sharad Pawar Politics: आश्चर्य, शरद पवारांकडे तब्बल 30 इच्छुकांनी मागितली उमेदवारी!

Sharad Pawar politics, Disappointed BJP, aspirants turned to NCP aspirants-महायुतीमुळे झाली भाजपची कोंडी, सर्वच पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी केला शरद पवारांचा धावा

Sampat Devgire

NCP Vs NCP News: भाजप हा महायुतीचा प्रमुख घटक पक्ष आहे. महायुतीत गेल्यामुळे या पक्षाकडे असलेल्या इच्छुक उमेदवारांमध्ये सध्या निराशेचे वातावरण आहे. त्यामुळे भाजपचे अनेक इच्छुक आता महाविकास आघाडीचे उंबरे झिजवत आहे.

निवडणुका जवळ येऊ लागल्या तशा भारतीय जनता पक्षातील इच्छुकांची अस्वस्थता वाढत आहे. ही स्थिती आता अक्षरशः टोकाला गेली आहे. भाजपचे अनेक इच्छुक रोज ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेत असल्याचे चित्र आहे.

भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे अनेक इच्छुक ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे या पक्षातील उमेदवारीची तयारी करणाऱ्या नेत्यांमध्येही अस्वस्थता निर्माण झाली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे इच्छुक असलेले मूळ उमेदवार एकत्र आले आहेत.

शरद पवार यांच्या पक्षातील या इच्छुक नेत्यांनी नुकतीच वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पक्षाच्या ओरिजनल कार्यकर्त्यांनाच संधी द्यावी. बाहेरून आलेल्यांना उमेदवारी देऊ नये, अशी विनंती पक्षाच्या वरिष्ठांकडे केली आहे.

गमतीचा भाग म्हणजे देवळाली मतदारसंघ यंदा राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचे कारण म्हणजे या राखीव मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे अक्षरश: उमेदवारीसाठी रांग लागली आहे. जिल्हा अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांच्याकडे ३० उमेदवारांनी भेट घेऊन उमेदवारी मागितली आहे. यातील २९ जणांनी पक्षाकडे अधिकृत अर्ज करून अनामत रक्कम देखील भरली आहे.

भारतीय जनता पक्ष सध्या महायुतीचा घटक आहे. महायुतीच्या विद्यमान आमदारांना उमेदवारी देण्याचा धोरणात्मक निर्णय झाला आहे. त्यामुळे देवळाली मतदारसंघातून विद्यमान आमदार सरोज अहिरे याच दावेदार असतील.

गेली तीन वर्ष भाजपकडे देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्ष प्रीतम आढाव, माजी मंत्री बबन घोलप यांची कन्या तनुजा घोलप, तहसीलदार पदाचा राजीनामा देऊन निवडणुकीची तयारी करणाऱ्या राजश्री अहिरराव यांसह अनेक उमेदवार होते.

या सर्व उमेदवारांची आता निराशा झाली आहे. देवळाली मतदारसंघात जागावाटपामध्ये भाजपला मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे भाजपच्या या पदाधिकाऱ्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली आहे.

या मतदारसंघात माजी आमदार योगेश घोलप हे देखील इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षकडे लक्ष्मण मंडाले, दीपक वाघ, नितीन मोहिते, संजय कुऱ्हाडे, सुवर्णा दोंदे आदी तीस उमेदवारांनी उमेदवारी मागितली आहे.

त्यामुळे राज्यात सर्वाधिक इच्छुक असलेला आणि शरद पवार सांगतील तो निर्णय मान्य आहे अशी तयारी असलेला मतदारसंघ म्हणून देवळाली मतदारसंघाची चर्चा होत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार राजाभाऊ वाजे यांना मोठी आघाडी मिळाली होती.

माजी मंत्री बबन घोलप, भगूरचे माजी नगराध्यक्ष विजय करंजकर, खासदार हेमंत गोडसे यापासून तर अनेक दिग्गज नेते ठाकरे गट सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडे गेले आहेत. असे असतानाही या पक्षाला लोकसभेत मतदारांनी साफ नाकारले.

हे सर्व नेते बदलत्या राजकीय स्थितीत प्रभावहीन ठरण्याची शक्यता आहे. त्याचे मुख्य कारण शिवसेना शिंदे गटाला या मतदारसंघात उमेदवारी मिळण्याची शक्यता नाही.

देवळाली मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गट या दोन्ही गटांतच लढत होण्याची चिन्हे आहेत. तिसऱ्या उमेदवाराला किती प्रभाव टाकता येईल, याबद्दल साशंकता आहे. त्यामुळेच सध्या अगदी इच्छुकांमध्येही देवळाली मतदारसंघात शरद पवार यांच्यावर सर्व राजकीय गणित अवलंबून आहे.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT