Sharad Pawar-J. P. Gavit Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dindori Constituency 2024 : शरद पवारांची मध्यस्थी यशस्वी; माकपचे गावित यांनी घेतली माघार

Sampat Devgire

Dindori News : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत मोठी फूट पडली होती. 'माकप'चे माजी आमदार जे. पी. गावित यांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या अडचणीत वाढ झाली होती.

दरम्यान, गेल्या आठवडाभरात माकपचे माजी आमदार गावित (J. P. Gavit) यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी विविध नेत्यांनी प्रयत्न केले होते. गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मतदारसंघाचा दौरा केला होता. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार माकपचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांनी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे महाविकास आघाडीत (MVA) फूट पडली. आघाडीच्या उमेदवाराला त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता होती. (Dindori Constituency 2024 News)

दरम्यान, माजी आमदार गावित यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार जळगाव दौऱ्यावर असताना त्यांची भेट घडवून आणली होती. माजी आमदार अनिल कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड आणि अन्य पदाधिकाऱ्यांसह शरद पवार यांनी गावित यांना माघार घ्यावी, असे सांगितले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव हा मुख्य उद्देश आहे. सबंध आघाडी त्यासाठी संघर्ष करीत आहे. त्यामुळे त्यात सहकार्य करावे, असे पवार म्हणाले. त्याला प्रतिसाद म्हणून माजी आमदार गावित यांनी माघार घेण्याचे मान्य केले होते. त्यानुसार त्यांनी आज आपल्या उमेदवारी अर्ज मागे घेतला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा दिंडोरी लोकसभा मतदारसंघात प्रभाव आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये गावित यांनी येथून पक्षातर्फे उमेदवारी केली होती. त्यात त्यांना सरासरी एक लाखाहून अधिक मते मिळालेली होती. हे सर्व आदिवासी आणि धर्मनिरपेक्ष मते आहेत. या मतांमध्ये गावित यांच्या उमेदवारीने फूट पडण्याची शक्यता होती. ही फुट टाळण्यासाठी गेल्या दोन दिवसात अतिशय वेगवान हालचाली घडल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भगरे यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यांनी गेल्या दोन आठवड्यांपासून मतदारसंघात प्रचार सुरू केला आहे. त्याला अतिशय चांगला प्रतिसाद आहे. गावित यांच्या उमेदवारीने कळवण-सुरगाणा, दिंडोरी-पेठ या प्रमुख मतदारसंघातील मतदानामध्ये फाटा-फूट होण्याचा मोठा धोका होता. गावित यांनी उमेदवारी मागे घेतल्याने महाविकास आघाडीचे भगरे यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

(Edited By : Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT