Ahilyanagar municipal election : पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघातील नगरपालिका निवडणुकीत भाजप आमदार मोनिका राजळे यांना शेवगाव नगरपालिकेत धक्का बसला आहे.
आमदार राजळे यांचे पक्षांतर्गत विरोधक अरुण मुंडे यांच्या पत्नी माया मुंडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून नगराध्यक्षपदावर निवडून आल्या आहेत. पाथर्डीत आमदार राजळे यांच्या नेतृत्वात अभय आव्हाड नगराध्यपदावर विजयी झाले आहेत. म्हणजेच, 'कही खुशी कही गम', अशी भाजपसाठी परिस्थिती मतदारसंघात होती.
शेवगाव नगरपालिका निवडणुकीत भाजपचे (BJP) प्रदेश चिटणीस अरुण मुंडे व आमदार राजळे समर्थकांमध्ये संघर्ष आहे. या पार्श्वभूमीवर मुंडे यांनी मिळवलेला विजय महत्त्वाचा ठरतो. दोन्ही बाजूने निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत माया मुंडे यांनी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्या लांडे यांच्यावर अवघ्या 86 मतांनी विजय मिळवला.
माया मुंडे यांच्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शेवगावमध्ये सभा घेतली होती. शेवगावमध्ये नगरपालिकेत अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दहा, भाजप सात, एकनाथ शिंदे शिवसेनेचे तीन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे तीन, असे पक्षीय बलाबल राहणार आहे.
पाथर्डी नगरपालिकेत भाजप आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सत्ता मिळवली. भाजपने नगराध्यक्षपदासह 14 जागांवर विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला पाच जागांवर विजय मिळाला. भाजपकडून अभय आव्हाड यांचा नगराध्यक्षपदावर 5 हजार 840 मतांनी विजय झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षचे उमेदवार बंडू पाटील बोरुडे यांचा पराभव केला. आव्हाड यांना 10 हजार 772, तर बोरुडे यांना 4 हजार 932 मते मिळाली.
पाथर्डी नगरपालिकेच्या प्रभाग पाचमध्ये भाजप उमेदवार शीतल लोहिया आणि अपक्ष उमेदवार दीपाली रामनाथ बंग यांना समसमान 840 मते मिळाली होती. या दोघींमध्ये चिठ्ठीने निवड करण्यात आली. प्रांजल शिवते या मुलीच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली. यात दीपाली बंग निवडून आल्या.
प्रभाग नऊ मध्ये भाजपच्या अर्चना फासे यांना 761, तर विरोधी राष्ट्रवादीच्या उमेदवार वंदना टेके यांना 762 मते मिळाली. टेके अवघ्या एक मताने निवडून आल्या. भाजपचे नंदकुमार शेळके सहाव्यांदा, तर मंगल कोकाटे सलग पाचव्यांदा निवडून आले. या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा एकही उमेदवार निवडून आला नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.