Shevgaon mayor husband controversy : शेवगाव नगरपरिषदेच्या प्रशासकीय कामकाजात एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाच्या नगराध्यक्षांच्या पती अथवा नातेवाईकांकडून अनधिकृत हस्तक्षेप होत असल्याची नगरसेवकांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे तक्रार केली होती. याप्रकरणी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी विजया घाडगे यांना नियमानुसार आवश्यक ती कडक कारवाई करण्याचे निर्देश डॉ. आशिया यांनी दिले आहेत.
नगरसेवकांच्या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश प्राप्त झाले आहेत. यापुढे शहानिशा करून नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे मुख्याधिकारी घाडगे यांनी म्हटले.
नगराध्यक्षांच्या (Mayor) पतीकडून अधिकारी-कर्मचाऱ्यांना अनधिकृत सूचना देणे, नगरपरिषदेचा कारभार हाताळणे, विकासकामांच्या फाईल व अभिलेख कार्यालयाबाहेर नेणे, ठेकेदार व तांत्रिक सल्लागारांवर दबाव आणणे, तसेच सर्वसाधारण सभेच्या कामकाजात बाहेरील व्यक्तींचा हस्तक्षेप घडवून आणणे, असे आरोप तक्रारीत करण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेच्या (Municipal Council) कार्यालयीन कामकाजात कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले. नगरपरिषदेतील अभिलेखांची अचानक तपासणी करून फाईल अथवा कागदपत्रे कार्यालयाबाहेर नेण्यात आली आहेत का? याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यासाठी आवक-जावक नोंदी, फाईल मूव्हमेंट रजिस्टर आणि सीसीटीव्ही फुटेज तपासून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. दबावाखाली काम केल्याचे आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
नगराध्यक्षांच्या पतीच्या हस्तक्षेपासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे दोन स्वतंत्र तक्रारी दाखल झाल्या आहेत. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सात, शिवसेनेचे तीन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे दोन, तर भाजपच्या सहा नगरसेवकांनी या दोन स्वतंत्र तक्रारी केल्या आहेत.
नगराध्यक्ष माया मुंढे यांनी, माझे पती नगरपरिषदेच्या कामकाजात कोणताही हस्तक्षेप करीत नाहीत. ते मला कार्यालयात सोडण्यासाठी येतात. शहरातील जनतेने आमच्यावर विश्वास टाकल्याने अनेक जण त्रस्त आहेत. जाणूनबुजून आमच्या कुटुंबाला त्रास देण्याचा प्रकार सुरू आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून जनतेची कामे करण्यावर पुढील काळात भर असणार असल्याचे सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.