Shirdi municipal election : शिर्डी नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी बरचं राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्या. शिर्डी नगरपालिकाच्या नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाल्यानं, विखे पाटील यांचे कट्टर समर्थक चांगलेच संतापले होते.
माजी नगराध्यक्ष तथा विखेंचे कट्टर समर्थक कैलासबापू कोते पाटील यांनी सुजय विखे पाटलांविरोधात शिवेवर बॅनरबाजी केली. यातच विरोधकांकडून मतदार याद्यांचा घोळाचे आरोप झाले. परंतु या सर्व राजकीय गदारोळावर मात करत, शिर्डी नगरपालिकेवर विखे पाटील पिता-पुत्रांनी वर्चस्व सिद्ध केलं. या विजयाचा आनंद व्यक्त करताना, विखे पिता-पुत्रानी विजयाची फुगडी खेळली.
नगराध्यक्षपदावर जयश्री थोरात यांचा विजय होताच, या विजयाचा आनंद व्यक्त करताना माजी खासदार सुजय विखे पाटलांनी शिर्डीत (Shirdi) विजय रॅली काढली. या रॅलीत वाहनावर वाघाची मूर्ती होती. 'टायगर अभी जिंदा है', असा सूचक इशारा विखे पाटलांनी दिला. शिर्डी नगरपालिकेत शिर्डी नगरपरिषद निवडणुकीत 23 जागांपैकी महायुतीतील भाजप, एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला, एकूण 20 जागा मिळाल्या, तर तीन अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत.
महाविकास आघाडीनं या निवडणुकीत मोठी ताकद लावत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाने नगराध्यक्ष पदासाठी भाग्यश्री सावकारे यांना रिंगणात उतरवलं. काँग्रेस पक्षाच्यावतीनं माधुरी शेजवळ यांना उमेदवारी देण्यात आली. भाजपचे (BJP) निष्ठावंत बाबुराव पुरोहित यांनी लोकक्रांती सेना आघाडीची स्थापना करून डॉ. कल्याणी आरणे यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून मैदानात उतरवलं होतं.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर मोठं आव्हान उभं केलं होते. यात माजी नगराध्यक्ष जयश्री थोरात यांना पुन्हा भाजपने संधी दिली. भाजपच्या उमेदवार जयश्री थोरात यांनी महाविकास आघाडी तसेच लोक क्रांती सेना आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना धूळ चारत विजय मिळवला.
शिर्डी नगरपालिका निवडणूक विखे पिता-पुत्रासाठी प्रतिष्ठेची बनली होती. विरोधकांनी सुरूवातीलापासून विखे पाटलांविरोधात वातावरण निर्मिती केली होती. शिर्डीत नगराध्यक्षपदासाठी चुरस वाढली होती. यातून विखे पाटलांभोवती त्यांच्याच समर्थकांमध्ये चढाओढ सुरू झाली होती. यातून सुजय विखे पाटील यांनी शिर्डी नगराध्यक्षपद राखीव निघू दे, मी लोणी ते शिर्डी पायी दर्शनला येईल, असे साईबाबा नवस केला असल्याचं विधान केलं. यातच नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव पडलं.
नगराध्यक्षपद महिलेसाठी राखीव झाल्याने विखे पाटलांचेच समर्थक कमालीचे नाराज झाले होते. सुजय विखे पाटलांविरोधात थेट शिवेवर त्यांचे कट्टर समर्थक कैलासबापू कोते पाटलांनी बॅनरबाजी केली होती. "शाळा सुटली, पाटी फुटली, आई मला दादांनी मारलं, आई, दादाचं वाक्य खरं ठरलं", अशा आशयाची ही बॅनरबाजी चर्चेची ठरली होती. यातच भाजपचे निष्ठावान बाबुराव पुरोहित यांनी देखील शिर्डी नगरपालिका निवडणुकीसाठी शड्डू ठोकला. त्यामुळे वातावरण विखेविरुद्ध सर्व असा संघर्ष शिर्डीत निर्माण झाला होता.
यावर मात करत शिर्डी नगरपालिका निवडणुकीत विखे पाटील पिता-पुत्रानी विजयश्री मिळवला. या विजयानंतर विखे पाटील पिता-पुत्राना आनंद गगनात मावेनासा झाला. आनंदाच्या भरात विखे पाटील पिता-पुत्रानी विजयाची फुगडी खेळली. ही फुगडी देखील आता चर्चेत आली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.