Shirdi Sai Election Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shirdi Sai Election : विखे पिता-पुत्रांना विवेक कोल्हेंचा शिर्डीत पुन्हा धक्का; 'साई संस्थान'वर निर्विवाद वर्चस्व!

Shirdi Sai Sansthan Election News : शिर्डी साई संस्थान सोसायटी निवडणुकीत परिवर्तन पॅनलचा १७ जागांवर दणदणीत विजय

Pradeep Pendhare

Shirdi News : विखे पिता-पुत्रांना त्यांच्या गृह मैदानावर विवेक कोल्हे गटाने पुन्हा एकदा दणका दिला आहे. शिर्डीतील साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटी निवडणुकीत कोल्हे गटाने सत्तांतर घडवून आणले आहे. कामगार नेते विठ्ठल पवार यांच्या परिवर्तन पॅनलने सोसायटीच्या सर्वच्या सर्व 17 जागांवर निर्विवाद विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे, पवार यांना घेरण्यासाठी विखे पिता-पुत्र गटाने त्यांचे स्वतंत्र दोन पॅनल रिंगणात उतरवले होते. निवडणुकीत तिरंगी लढत झाली. यात विखेंचा सुफडा साफ करत, कोल्हेंनी बाजी मारली आहे. (Shirdi Sai Sansthan Election News)

शिर्डीतील साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. शिर्डी संस्थानमधील कर्मचाऱ्यांची ही सोसायटी म्हणजे कामधेनू! सोसायटी ही निवडणूक पहिल्या दिवसापासून रंगतदार स्थिती होती. निवडणुकीसाठी तीन पॅनल होते. 17 जागांसाठी 53 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे गटाचा साई हनुमान पॅनल, खासदार ‌डाॅ. सुजय विखे यांच्या गटाचा साई जनसेवा पॅनल होता. तर या विरोधात कामगार नेते विठ्ठल पवार यांच्या परिवर्तन पॅनल होता.

विठ्ठल पवार यांना विखे पिता-पुत्र यांच्या गटाच्या पॅनलने तगडे आव्हान उभे केले होते. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. यासाठी आज 11 फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया पार पाडली असून 97% मतदान झाले आणि लगेचच मतमोजणी झाली. यात 17 शून्याच्या फरकाने कामगार नेते विठ्ठल पवार यांच्या परिवर्तन पॅनलने विखे गटाच्या दोन्ही पॅनलचा पराभव करत सोसायटीची सत्ता खेचून आणली.

कोट्यवधीची आहे उलाढाल -

या सोसायटीत 1 हजार 666 सभासद आणि साईबाबा सोसायटीचे 200 कर्मचारी संख्या असलेल्या साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीची वार्षिक उलाढाल जवळपास दीडशे कोटी रूपये आहे. तर वार्षिक नफा चार कोटी रुपयांपर्यंत असून 75 कोटी रूपयांच्या ठेवी आहेत.

गणेशनगरनंतर विखेंना दुसरा झटका -

राहाता तालुक्यात गणेश सहकारी कारखाना, ग्रामपंचायत निवडणुकीत विखे पिता-पुत्रांच्या गटाला पराभवाचे धक्के बसले आहेत. यानंतर आता शिर्डी देवस्थानच्या सोसायटीत देखील विखे पिता-पुत्र गटाला पराभव पाहावा लागलाय. निडवणुकीत विखे पिता-पुत्रांनी स्वतंत्र पॅनल उतरवल्याने महसूलमंत्री सत्ता राखणार का? याकडे सर्वांच लक्ष लागले होते. मात्र विवेक कोल्हे पुरस्कृत विठ्ठल पवार यांच्या परिवर्तन पॅनलने विखे पिता-पुत्र गटाच्या पॅनलला पराभवाची धूळ चारली.

विवेक कोल्हेंची पडद्यामागून सूत्र हलवली -

गणेश सहकारी कारखान्यात काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात आणि भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी एकत्र येत सत्तेचा ताबा घेतला. त्यानंतर साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीत विठ्ठल पवार यांच्या परिवर्तन पॅनलला विवेक कोल्हे यांनी पडद्यामागून बळ दिले. मात्र विजयी मिरवणुकीत जल्लोष करण्यासाठी भाजपचे विवेक कोल्हे थेट मतमोजणी केंद्रावर पोहोचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. यावेळी कोल्हे यांनी कार्यकर्त्यांसोबत आनंद साजरा केला.

हे उमेदवार झाले विजयी -

महादू बाप कांदळकर, कृष्णा नाथा आरणे, भाऊसाहेब चांगदेव कोकाटे, संभाजी शिवाजी तुरकने, देविदास विश्वनाथ जगताप, पोपट भास्कर कोते, विनोद गोवर्धन कोते, मिलिंद यशवंत दुनबळे, तुळशीराम रावसाहेब पवार, रवींद्र बाबू गायकवाड, भाऊसाहेब लक्ष्मण लवांडे,इकबाल फकीर महंमद तांबोळी, गणेश अशोक अहिरे, सुनंदा किसन जगताप, लता मधुकर बारसे, विठ्ठल तुकाराम पवार हे विजयी झाले आहेत.

हा दहशतीविरुद्ध उठवलेला आवाजाचा विजय : कोल्हे

"17 शून्यने विठ्ठल पवार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा दणदणीत विजय झालाय. त्याबद्दल मी सर्व विजय उमेदवारांचे अभिनंदन करतो आणि सर्व सभासदांचे आभार मानतो. हा सर्वसामान्य कर्मचाऱ्यांचा विजय आहे. हा दहशतविरुद्ध आणि अन्यायाविरुद्ध उठवलेल्या आवाजाचा विजय आहे. हा दडपशाही करून 598 लोकांवर अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात उठाव झाल्याचा विजय आहे", अशी प्रतिक्रिया युवा भाजप नेते विवेक कोल्हे यांनी विजयानंतर दिली आहे.

अदृश्य शक्ती मुळे विजय : विठ्ठल पवार -

"साईबाबांच्या आशीर्वादामुळे आणि साई संस्थानमधील सर्वच कामगारांच्या पाठिंब्यामुळे विजय शक्य झाला. माझ्या मित्रपरिवार आणि ज्ञात अज्ञात अदृश्य शक्तींनी मला साथ दिली. त्यामुळे हा विजय मिळालाय. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करतोय आणि संघर्षाची पावती म्हणून सर्व कामगारांनी आमच्यावर जबाबदारी टाकली. देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या देवस्थानची संस्था असल्याने भविष्यात आम्हाला ते पुढे नेण्यासाठी काम करावे लागेल. आगामी काळात सर्वांना सोबत घेऊन संस्थेच्या प्रगतीसाठी काम करेल", अशी प्रतिक्रिया परिवर्तन पॅनलचे नेते विठ्ठल पवार यांनी दिली आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT