Shirpur MLA Kashiram Pawara inspects employee attendance at the Panchayat Samiti office : भाजपचे शिरपूरचे आमदार काशीराम पावरा यांनी शासकीय कार्यालयातील लेटलतीफ कर्मचाऱ्यांविरोधात थेट मैदानात उतरत पंचायत समितीवर धडक दिली. सकाळीच कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठाण मांडून त्यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांची हजेरी तपासली. १२५ पैकी केवळ ७१ जण उपस्थित असल्याचे आणि वर्षभरापासून बायोमेट्रिक मशीन बंद असल्याचे समोर येताच त्यांनी प्रशासनाची चांगलीच कानउघडणी केली.
पंचायत समितीमधील अधिकारी आणि कर्मचारी वेळेवर कार्यालयात येत नसल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. या तक्रारींची दखल घेत आमदार काशीराम पावरा यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता सकाळीच पंचायत समिती गाठली. कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ थांबून त्यांनी हजेरी पुस्तक ताब्यात घेतले. त्यानंतर स्वतः अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची पडताळणी केली. आमदारांनी अचानक केलेल्या या पाहणीमुळे पंचायत समिती प्रशासनाची धावपळ उडाली.
कार्यालयीन वेळेत उपस्थित न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना आमदार पावरा यांनी जाब विचारला. शासकीय कामकाजाच्या निर्धारित वेळेत कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापुढे उशिरा येणाऱ्या किंवा कोणतीही पूर्वपरवानगी न घेता गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
या पाहणीदरम्यान आणखी एक गंभीर बाब निदर्शनास आली. कर्मचाऱ्यांची हजेरी नोंदविण्यासाठी पंचायत समिती कार्यालयात बसविण्यात आलेले बायोमेट्रिक मशीन तब्बल वर्षभरापासून बंद असल्याचे समोर आले. या प्रकाराबद्दल आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांची सविस्तर माहिती गोळा करून संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
आमदारांच्या या अचानक भेटीमुळे पंचायत समितीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये दिवसभर चर्चा सुरू होती. दरम्यान, या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत असून, केवळ पंचायत समितीपुरती मर्यादित न राहता इतर शासकीय कार्यालयांमध्येही अशाच प्रकारे तपासणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.