Amol Khatal Vs Balasaheb Thorat Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Amol Khatal Vs Balasaheb Thorat : 'भावी मुख्यमंत्र्याचा पराभव करून आलो'; आमदार अमोल खताळांचा बाळासाहेब थोरातांना अप्रत्यक्ष टोला

Amol Khatal targets Balasaheb Thorat, highlights Sangamner development agenda : निमज येथील विकासकामांच्या शुभारंभावेळी खताळ यांची टीका; "40 वर्षे माणसं जिरवण्याचं राजकारण झालं, आता पाणी जिरवण्याची वेळ" म्हणत महायुतीच्या विकासाचा दावा.

Pradeep Pendhare

Sangamner Politics : "मी महाराष्ट्रातील 288 आमदारांमध्ये स्वतःला सर्वात नशीबवान समजतो. कारण या तालुक्यातील जनतेच्या आशीर्वादामुळे मी भावी मुख्यमंत्र्याचा पराभव करून विधानसभेत पोहोचलो," असे म्हणत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता जोरदार टोला लगावला.

संगमनेर (Sangamner) तालुक्यातील निमज येथे सुमारे 89 लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ आमदार खताळ यांच्या हस्ते झाला. यावेळी त्यांनी गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे सांगत विकासकामांमध्ये अडथळे आणणाऱ्यांना जनता योग्य वेळी उत्तर देईल, असा इशाराही दिला.

"आमदार झाल्यापासून तालुक्यातील कोणत्याही गावाशी भेदभाव केलेला नाही. ज्या गावात मला कमी मतदान झाले, त्या गावातील लोकही माझेच मतदार (Voter) आहेत, ही भावना ठेवून मी काम करत आहे. त्यामुळे विकासकामांमध्ये कितीही अडथळे आले तरी निधी देणे थांबवणार नाही," असे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी त्यांनी संगमनेरच्या राजकारणावरही टीका करत, "या तालुक्यात गेली 40 वर्षे माणसं जिरवण्याचे राजकारण झाले. आता माणसं नाही, तर पाणी जिरवण्याचे राजकारण करायचे आहे," असे म्हणत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून सिंचन प्रकल्पांना गती देण्याचा निर्धार व्यक्त केला.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी तयारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांवर भाष्य करत खताळ म्हणाले, "गावाचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकाच विचाराचे सरकार असणे आवश्यक आहे. सध्या संगमनेरपासून दिल्लीपर्यंत महायुतीचे सरकार असल्याने विकासकामांसाठी निधीची कमतरता नाही. मात्र काही विघ्नसंतोषी विकासकामांमध्ये अडथळे निर्माण करत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतही सत्ता मिळणे गरजेचे आहे."

विकासकामांसाठी विरोधकांच्या प्रमाणपत्राची गरज नाही

निधीबाबत कोणतीही चिंता करण्याचे कारण नसल्याचे सांगताना त्यांनी गेल्या दीड-दोन वर्षांत संगमनेरसाठी एमआयडीसी मंजूर करून आणल्याचा तसेच भोजापूर चारीसाठी 45 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचा दावा केला. "विकासाच्या बाबतीत विरोधकांच्या प्रमाणपत्राची आम्हाला गरज नाही," असा टोला त्यांनी शेवटी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT