Sanjay Raut, Anna Hazare Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Anna Hazare News : अण्णा हजारे हरवले आहेत; खासदार संजय राऊत असे का बोलले?

Pradeep Pendhare

Ahmednagar News : आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर विरोधकांनी भाजप सरकारला धारेवर धरले आहे. भाजपच्या कारभाराला हुकूमशाहीची उपमा देत इलेक्ट्राेल बाँडचादेखील हिशोब द्यावा. आम्ही अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाबरोबर ठामपणे उभे आहोत, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सांगितले. तसेच अण्णा हजारे (Anna Hazare News) आणि अरविंद केजरीवाल हे एके काळचे सहकारी होते. याकडे लक्ष वेधल्यावर 'अण्णा हजारे यांना अगोदर जागे करा. कुठे आहेत, ते बघा. आता मला माहीत नाही, ते कुठे असतात ते! एकेकाळी आंदोलन होते, याविरोधात त्यांचे. आता ते कुठे हरवले आहेत, ते माहीत नाही', अशा शब्दांत राऊत यांनी फटकारले आहे.

देशात 2014 पासून भाजप (BJP) सरकार आले आहे. तेव्हापासून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांची आंदोलने कमी झाली आहेत. अण्णा हजारेंवर विरोधकांकडूनदेखील आरोप झाले. याकडे अण्णांनी दुर्लक्ष केले आहे. केजरीवाल (Arvind Kejriwal) सत्तेत आल्यानंतर त्यांनी मद्य धोरण आणले. यावर अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. अण्णांचे अरविंद केजरीवाल यांना पहिलेच पत्र होते. यात त्यांनी केजरीवाल यांच्यावर टीका केली.

"तुम्ही सत्ता व सत्तेतून पैसा या दुष्टचक्रात अडकलेला दिसतात. दिल्लीचे मुख्यमंत्री झाल्यानंतर तुम्ही लोकपाल आणि लोकायुक्त कायदा विसरलात. तुमच्या सरकारने महिलांवर परिणाम करणारे, लोकांचे जीवन उद्ध्वस्त करणारे दारू धोरण आणले. यावरून तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात तफावत असल्याचे दिसून येते", अशा कठोर शब्दांत अण्णांनी केजरीवाल यांच्यावर टीका केली होती. दिल्ली सरकारच्या मद्य गैरव्यवहाराची सीबीआय चौकशी करीत आहे. यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दोषी आढळल्यास त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, असे मत अण्णा हजारे यांनी व्यक्त केले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, केजरीवाल यांच्यावर झालेली कारवाई म्हणजे, "भाजपला त्यांचा पराभव दिसू लागला आहे. भाजपमध्ये येण्यासाठी त्यांच्यावर प्रचंड दबाव होता आणि आहे. तसा आमच्यावरदेखील दबाव आहे. पण आम्ही घाबरलो नाही. हुकूमशाही विरोधात आम्ही उभे आहोत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अरविंद केजरीवाल यांच्यामागे आणि त्यांच्या पक्षाच्या मागे ठामपणे उभा आहे. भष्ट्राचाराच्या विरोधात अण्णा हजारेंबरोबर लढाई करणारे अरविंद केजरीवाल हे भष्ट्राचाराच्या आरोपावरून अटक झाले आहेत, असे माध्यमांनी विचारल्यावर खासदार राऊत यांनी 'अण्णा आता कुठे हरवले आहेत, ते माहीत नाही', अशा शब्दांत फटकारले.

केजरीवाल होते अण्णांचे विश्वासू

केजरीवालांना अटक झाल्यानंतर अण्णा हजारे आणि केजरीलांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. अरविंद केजरीवाल हे 2011 मध्ये अण्णा हजारे यांच्या संपर्कात आले. त्यांनी लोकपाल कायद्यासाठी इंडिया अगेंस्ट करप्शन ग्रुपची स्थापना केली. दिल्लीच्या रामलीला मैदानावर 16 ऑगस्ट 2011 मध्ये सुरू केलेले हे आंदोलन 28 ऑगस्टपर्यंत सुरू राहिले. किरण बेदी, कुमार विश्वास, संजय सिंह आणि मनीष सिसोदिया यांनी या आंदेलनात महत्त्वाची भूमिका निभावली. यात अग्रभागी आले ते अरविंद केजरीवाल.

यानंतर पुढे  18 सप्टेंबर 2012 मध्ये दिल्लीत बैठक झाली. या वेळी अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांनी राजकीय मार्ग स्वीकारला. अरविंद केजरीवाल यांनी 2 ऑक्टोबर 2012 रोजी राजकीय पक्ष स्थापन केला. केजरीवाल यांनी 24 नोव्हेंबर 2012 मध्ये आम आदमी पक्ष, असे नाव पक्षाला दिले. या सर्व कृतीने अण्णा हजारे कमालीचे नाराज झाले आणि ते अरविंद केजरीवाल यांच्यापासून दूर गेले. दिल्ली विधानसभा 2013 मध्ये अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने अभूतपूर्व यश मिळवले. मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा पराभव झाला. काँग्रेसने बाहेरून पाठिंबा देत केजरीवाल यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घातली. पुढे 2015 मध्येदेखील अरविंद केजरीवाल यांचा पक्ष सर्वाधिक 67 जागांवर विजय झाला. भाजपने 2020 मध्ये आम आदमी पक्षाला हरवण्यासाठी बरीच मेहनत घेतली. या वेळीदेखील 70 पैकी 62 जागांवर आम आदमी पक्षाने विजय मिळवला. ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले.

(Edited By - Rajanand More)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT