Shivaji Kardile sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivaji Kardile : शिवाजी कर्डिलेंनी आखला 'सगेसोयऱ्यांचा' राजकीय पटल; अजितदादांचं मिळणार बळ?

Pradeep Pendhare

Ahmednagar News : माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर श्रीगोंदा आणि राहुरी मतदारसंघातील राजकीय गणिते बदलली आहेत. सगेसोयऱ्यांच्या राजकारणात 'माहीर' असलेले शिवाजी कर्डिले अजितदादांची भेट घेऊन राजकीय पटल आखला आहे. यात श्रीगोंदा तालुका बागायतदार आणि राजकीय नेत्यांची खाण! त्यामुळे येथून इच्छुक असलेले शिवाजी कर्डिले कोणा-कोणाचा पत्ता कट करणार की, स्वतःने आखलेले पटल समेटणार, याकडे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादांची (Ajit Pawar) भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी भेट घेतली. शिवाजी कर्डिले जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत. याशिवाय मंत्री राधाकृष्ण विखे यांचे निष्ठावान आहेत. मंत्री विखेंसाठी कर्डिले नेहमीच किंगमेकरच्या भूमिकेत राहिलेत. लोकसभा निवडणुकीत त्यांचा करिष्मा चालला नसला तरी, ते सगेसोयऱ्यांचे राजकारणामुळे त्यांचा नगरच्या राजकारणात दबदबा आहे. त्यामुळे कर्डिलेंनी कोणतेही कृती केली की, नगरमधील राजकीय पटल फिरतो. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेची तयारी सुरू आहे. यातच अजितदादांची कर्डिले यांनी भेट घेतल्याने श्रीगोंद्यातील राजकीय गणित चर्चेत बदलली आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी श्रीगोंद्यात डझनपेक्षा जास्त नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. यातच शिवाजी कर्डिले यांनी श्रीगोंद्यातून चाचपणी सुरू केल्याचे दिसते. यासाठी अजितदादांची भेट घेतल्याची चर्चा आहे. गेल्या पंचवार्षिकच्या विधानसभा निवडणुकीत भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थेट लढत झाली. बबनराव पाचपुते आणि घनश्याम शेलार यांच्यातील अटीतटीच्या लढातीत पाचपुते विजयी झाले. माजी आमदार राहुल जगताप यांनी निवडणूक लढली नाही. पण यंदा त्यांनी कुकडी सहकारी साखर कारखाना, जिल्हा बँक आणि बाजार समितीवर बाजी मारत पायाभरणी केली आहे.

आमदार बबनराव पाचपुते वयोमानाने थकले आहेत. त्यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते मतदारसंघात फिरताना दिसत आहे. याशिवाय पाचपुते यांचे पुत्र देखील मतदारसंघात कार्यरत आहेत. राजेंद्र नागवडे यांनी नागवडे सहकारी साखर कारखान्यातून आणि अजितदादांची साथ घेत पकड मजबूत करत आहेत. यासाठी नागवडे यांनी काँग्रेसचा हात सोडला. घनश्याम शेलार बीएसआरमधून पुन्हा काँग्रेसमध्ये आलेत. बाबासाहेब भोस यांनी शरद पवार यांची तुतारी हाती घेतली आहे. साजन पाचपुते यांनी देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जात मशाल हाती घेतली आहे.

महाविकास आघाडीकडून माजी आमदार राहुल जगताप पुन्हा चर्चेत आले आहेत. महायुतीत आमदार बबनराव पाचपुते सक्रिय आहेत. यातच शिवाजी कर्डिले यांनी श्रीगोंद्यातून चाचपणी सुरू केल्याने श्रीगोंद्याचा राजकीय पटल बदलतो की, काय अशी चर्चा आहे. अजितदांदा यांची भेट घेऊन कर्डिले यांनी हा पटल आखलेला दिसतो. परंतु राजेंद्र नागवडे यांनी अजितदादांकडून उमेदवारीचा शब्द घेतल्याचे बोलले जाते. घनश्याम शेलार यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तर, साजन पाचपुते यांना शिवसेनेचे संजय राऊत यांनी शब्द दिला आहे. अशा स्थितीत शिवाजी कर्डिले यांनी अजितदादांची भेट घेऊन आखलेले राजकीय पटल कितपत पुढे सरकतो, हे पाहावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT