Aaditya Thackeray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Aaditya Thackeray News : पुन्हा मिठाचा खडा,'वंचित'ची ठाकरेंच्या बैठकीकडे पाठ

Vanchit Bahujan Aaghadi : शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी बुधवारी नाशिकचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलाविली होती.

Sampat Devgire

Nashik Political News : वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश झाल्याची चर्चा होत आहे. मात्र, महाविकास आघाडीत वंचितच्या समावेशाचे चित्र स्पष्ट झाले नाही. त्यात नाशिक दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरे यांनी बैठकीचे आयोजन केले होते.

महाविकास आघाडीतील पक्ष या बैठकीला उपस्थित राहणार होते. स्थानिक पातळीवर लढण्यासंदर्भात रणनीतीविषयी या बैठकीत चर्चा होणार होती. मात्र, 'वंचित'चे पदाधिकारी या बैठकीकडे फिरकलेच नाहीत. (Aaditya Thackeray News in Marathi)

शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी बुधवारी (ता.14) नाशिकचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलाविली होती. नाशिक रोड येथे झालेल्या या बैठकीला सर्व नेत्यांना निमंत्रित करण्यात आले होते.

मात्र, यात वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit) नेते, पदाधिकारी अनुपस्थित राहिले. अनुपस्थित राहण्यामागे कोणतेही ठोस कारण न देता वरिष्ठांच्या सूचना नसल्याने बैठकीत गेलो नसल्याचा खुलासा या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे लोकसभेची तयारी करणाऱ्या महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडल्याची चर्चा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणुकीबाबत महायुतीच्या घटक पक्षांमध्ये जागावाटपाविषयी कोणताही ठोस फाॅर्म्युला निश्चित होऊ शकलेला नाही. अशा स्थितीत महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी मात्र बहुतांशी मतदारसंघांच्या जागावाटपाबाबत धोरणात्मक भूमिका निश्चित केलेली आहे. या भूमिकेनुसार नाशिकची जागा शिवसेनेला देण्याचे स्पष्ट संकेत आहेत.

शिवसेनेनेदेखील निवडणुकीची तयारी जोरकसपणे सुरू केली आहे. आदित्य ठाकरे यांचा दौरा यासंदर्भात असल्याने भारतीय जनता पक्षाचे नेते त्यावर लक्ष ठेवून होते. वंचित आघाडीने या बैठकीकडे पाठ फिरविल्याने लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपला त्याचा अप्रत्यक्षरीत्या लाभ होणार असल्याची चर्चा आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या 2019 च्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवाराला मत विभागणीचा मोठा लाभ झाला होता. 2019 मध्ये अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पवन पवार या दोन्ही उमेदवारांना चांगली मते मिळाली होती.

त्यामुळे या मतदारसंघांमध्ये वंचितची मते महत्त्वपूर्ण ठरणार आहेत, जर वंचित स्वतंत्र लढले तर त्याचा फायदा मत विभागणीतून भाजपला होणार असल्याचे चित्र आहे. त्यात वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंच्या बैठकीला अनुपस्थित राहून आपल्याला गृहित धरू नका, असाच संदेश दिला असल्याची चर्चा आहे.

(Edited By Roshan More)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT