Shivsena agitation against ED Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

‘भाजपचे शंभर दाऊद, तर सेनेचा एकच राऊत’

धुळ्यात खासदार राऊत यांच्या समर्थनार्थ प्रखर आंदोलन; ३० कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा

Sampat Devgire

धुळे : ‘ईडी’ने (ED) शिवसेनेचे फायरब्रँड नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मालत्तांवर टाच आणल्यानंतर येथील कार्यकर्ते या कारवाईच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरले. त्यांनी राणाप्रताप चौकात प्रखर आंदोलनातून ‘ईडी’च्या प्रतीकात्मक रावणरुपी पुतळ्याचे दहन केले. शिवसेनेच्या (Shivsena) काही कार्यकर्त्यांनी विक्षिप्त हावभावसह बेकायदेशीर आंदोलन केल्याची पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करत भाजपच्या शिष्टमंडळाने विरोधक आंदोलकांचा निषेध केला.

यात शिवसेना- भाजपत जुंपली असतानाच पोलिसांनी शिवसेनेच्या तीस आंदोलक कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

खासदार राऊत यांच्या काही मालमत्तांवर ‘ईडी’ने टाच आणल्यानंतर शिवसेनेतील पडसाद धुळे शहरात उमटले. ‘भाजपचे शंभर दाऊद, तर सेनेचा एकच राऊत’, अशी घोषणाबाजी करत शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या यांच्यावर ईडीचे हस्तक, अशा आरोपातून हल्लाबोल केला. तसेच मोदी, फडणवीस, सोमय्या यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचेही दहन केले. नेते खासदार राऊत यांना अटक झाली, तर ईडी, सीबीआय कार्यालयांची रॉकेल टाकून राखरांगोळी करू, असा इशारा आंदोलकांनी दिला.

टरबूज कापून संताप व्यक्त

माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या पोस्टरसमोर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी टरबूज फोडून ईडीच्या कारवाईबाबत संताप व्यक्त केला. सहसंपर्कप्रमुख महेश मिस्तरी, महानगरप्रमुख मनोज मोरे म्हणाले, की खासदार राऊत यांच्यावर ईडीने केलेली कारवाई अन्यायकारक आहे. त्यांनी भाजपविरोधात आवाज उठविल्याने ही कारवाई झाली. नारायण राणे, डॉ. विजयकुमार गावित, बबनराव पाचपुते आदी भाजपत गेल्याने त्यांच्यावर कारवाई नाही. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांसह नेत्यांना त्रास दिला जात आहे. राज्यात सत्ता येत नसल्याने भाजपला नैराश्‍य आले आहे. त्यामुळे ते ईडीचा आधार घेत महाराष्ट्राला अस्थिर करण्याच्या प्रयत्नात आहेत. ईडी, सीबीआयचा सत्तेसाठी गैरवापर सुरू आहे. भाजपची अशी दहशत खपवून घेतली जाणार नाही.

शिवसेनेच्या ‘या’ आंदोलकांवर गुन्हा

जमावबंदी आदेशाचे उल्लंघन आणि प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी विलास पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिवसेनेचे महानगरप्रमुख मनोज मोरे, सतीश महाले, जिल्हाध्यक्ष डॉ. तुळशीराम गावित, सहसंपर्कप्रमुख हिलाल माळी, महेश मिस्तरी, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, माजी जिल्हाध्यक्ष अतुल सोनवणे, संजय गुजराथी, गुलाब माळी, प्रफुल्ल पाटील यांच्यासह तीस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला. शिवाय आंदोलनात डॉ. सुशील महाजन, संजय वाल्हे, संदीप चव्हाण, धीरज पाटील, विनोद जगताप, संदीप सूर्यवंशी, प्रवीण साळवे, भरत मोरे, कैलास मराठे, भटू गवळी, मुरलीधर जाधव, राजेश पटवारी, बबन थोरात, डॉ. भरत राजपूत, देवा लोणारी, नितीन शिरसाट, अरुणा मोरे, संगीता जोशी, सुनीता वाघ आदी सहभागी झाले होते.

....

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT