Dhule Bank Unopposed Candidates Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

अमरीशभाई पटेल यांचे बिनिवरोधचे प्रयत्न शिवसेनेने उधळून लावले!

धुळे जिल्हा बॅंक निवडणुकीत तीन माजी आमदार रिंगणात असून सात जण बिनविरोध निवडून आले आहेत.

Sampat Devgire

धुळे : धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत ७९ उमेदवारी अर्जांपैकी ५२ इच्छुकांनी माघार घेतली. यामध्ये २७ पैकी सात उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यामुळे आता दहा जागांसाठी २० उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेने वेगळी चूल मांडल्याने निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नांना धक्का बसला.

ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी माजी मंत्री तथा आमदार अमरिशभाई पटेल (Ex Minister Amrishbhai Patel) यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलची स्थापना झाली. मात्र, शिवसेनेने (Shivsena) वेगळी चूल मांडली. त्यामुळे पॅनलमधील भाजप, (BJP) काँग्रेस, (Congress) राष्ट्रवादी काँग्रेससह (NCP) शिवसेनेचे उमेदवार लढतीत एकमेकांच्या आमनेसामने आहेत. त्यात भाजपचे नेते व बँकेचे अध्यक्ष माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, काँग्रेसचे माजी आमदार प्रा. शरद पाटील रिंगणात आहेत.

धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकींतर्गत ७९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यात सोमवारी एकूण ५२ उमेदवारांनी माघार घेतली. तसेच निवडणूक यंत्रणेकडून एकूण १७ पैकी सात जागा बिनविरोध घोषित झाल्या. त्यामुळे नऊ मतदारसंघांत उर्वरित दहा जागांसाठी २० उमेदवारांमध्ये लढत होईल. ही निवडणूक बिनविरोध होण्याच्या प्रयत्नांना प्रामुख्याने धुळे जिल्ह्यातील साक्री आणि नंदुरबार जिल्ह्यातील उमेदवारांनी सुरुंग लावला. त्यात सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलची मोडतोड झाली.

प्रमुख नेत्यांचा हिरमोड

जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी नेत्यांनी सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलची स्थापना केली. मात्र, शिवसेनेने वेगळी चूल मांडली. त्यामुळे पॅनलमध्ये भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश राहिला. या पॅनलचे नेतृत्व माजी मंत्री व भाजपचे आमदार अमरिशभाई पटेल यांच्याकडे सोपविले. मात्र, माघारीच्या निर्धारित वेळेपर्यंत प्रामुख्याने साक्री, नंदुरबार जिल्ह्यातून बिनविरोधाच्या प्रयत्नांना शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेते, पदाधिकाऱ्यांनी सुरुंग लावला. त्यामुळे निवडणूक अटळ झाली.

निवडणुकीत प्रथम चार आणि माघारीवेळी सोमवारी तीन अशा एकूण सात जागा बिनविरोध झाल्या आहेत. काँग्रेसचे आमदार शिरीष नाईक (नवापूर), भगवान पाटील (कापडणे), इतर मागासवर्गीय मतदारसंघातून श्‍याम सनेर, बिनविरोध निवडून आले. तत्पूर्वी, भाजपचे दीपक पाटील (शहादा), प्रभाकर चव्हाण (शिरपूर), भरत माळी (तळोदा), तर शिवसेनेचे आमशा पाडवी (अक्कलकुवा) हे चौघे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

यांच्यात होणार लढत...

लढतीतील मतदारसंघनिहाय प्रतिस्पर्धी उमेदवार : प्राथमिक कृषी पतसंस्था, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, संयुक्त शेती संस्था, धान्य अधिकोश सहकारी संस्था, आदिवासी सेवा सहकारी संस्था- साक्री तालुका : हर्षवर्धन शिवाजीराव दहिते (भाजप, सामोडे), अक्षय पोपटराव सोनवणे (राष्ट्रवादी काँग्रेस, इंदवे), शिंदखेडा तालुका : राजेंद्र देसले (भाजप, देवपूर-धुळे), संध्याबाई बोरसे (अपक्ष, होळ), नंदुरबार तालुका : चंद्रकांत रघुवंशी (शिवसेना, सोनगीरपाडा), पावबा धनगर (भाजप, भोणे), नवापूर तालुका : अभिमन वसावे (काँग्रेस, बिलीपाडा, नवापूर), अमरसिंग गावित (भाजप, कोठळा), अक्राणी महल तालुका : संदीप वळवी (शिवसेना, कात्री), विलास पाडवी (काँग्रेस), महिला प्रतिनिधी : शीलाबाई विजय पाटील (काँग्रेस पुरस्कृत, नवलनगर, ता. धुळे), हिरकरणबाई बाबूराव पाटील (शिवसेना, होळतर्फे रनाळे, ता. नंदुरबार), सीमा तुषार रंधे (भाजप, बोराडी, ता. शिरपूर), भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग- दर्यावगीर महंत (भाजप, सामोडे, ता. साक्री), सुरेश फकिरा शिंत्रे (शिवसेना, रनाळे, ता. नंदुरबार), कृषी व पणन संस्था व शेतमाल प्रक्रिया संस्था- राजवर्धन कदमबांडे (भाजप, धुळे), अंकुश विक्रम पाटील (शिवसेना, बलदाणे, ता. नंदुरबार), इतर शेती संस्था- सुरेश रामराव पाटील (भाजप, देवपूर-धुळे), प्रा. शरद पाटील (काँग्रेस, कुसुंबा, ता. धुळे), लक्षदीप सोनवणे (अपक्ष, नेर, ता. धुळे).

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT