HemaMalini, gulabrao patil, Om Puri sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

हेमामालिनींचा गाल सोडून गुलाबराव पाटलांनी आता ओमपुरींचा गाल पकडला

''चॅनेलवाल्यांनी माझं ते वक्तव्य प्रचंड चालवलं. त्यामुळं आता तो गाल सोडला आणि ओम पुरीचा गाल पकडलाय. आता त्यावरून तरी कोणी टीका करू नये,'' असे गुलाबराव पाटील म्हणाले.

सरकारनामा ब्युरो

जळगाव : बोदवड नगरपंचायतीच्या निवडणूक प्रचारसभेत बोलताना जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil)म्हणाले होते, ''धरणगावातील रस्ते हे हेमामालिनीच्या (HemaMalini)गालासारखे आहेत. तुम्हाला साधा बोदवडचा रस्ता करता आला नाही,'' असा टोला जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांचा उल्लेख न करता लगावला होता. आता गुलाबराव पाटील यांनी रस्त्यांची तुलना हेमामालिनींच्या गालाऐवजी ओमपुरींच्या गालाशी केली आहे. त्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विकासकामाचे उद्धघाटन झाले. यावेळी ते बोलत होते. ''माझ्या मतदारसंघातील रस्ते अभिनेत्री हेमामालिनींच्या गालासारखे गुळगुळीत असल्याचं वक्तव्य पाटील यांनी नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलं होतं. त्या वक्तव्याची आठवण त्यांनीच पुन्हा करुन दिली.

''खराब रस्ते चांगले करण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगताना मी जे बोलून गेलो, त्यातून कुणाचेही मन दुखवण्याचा माझा हेतू नव्हता. मागच्या भाषणावेळी माझ्या शब्दांचा विपर्यास केला गेला. चॅनेलवाल्यांनी माझं ते वक्तव्य प्रचंड चालवलं. त्यामुळं आता तो गाल सोडला आणि ओम पुरीचा गाल पकडलाय. आता त्यावरून तरी कोणी टीका करू नये, अशी खोचक टीका त्यांनी यावेळी केली. त्यांच्या या विधानावर उपस्थितांमध्ये हशा पिकला.

भुसावळ येथील रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शनिवारी झालं. त्यावेळी त्यांनी आपल्या खास ग्रामीण शैलीत उपस्थितांनी संवाद साधला. मतदारांच्या हुशारीचंही त्यांनी कौतुक केलं. पाटील म्हणाले, ''मतदार हे कामाचं मूल्यमापन करत असतात. निवडणूक लागली की सकाळी शिवसेनेचं मटण खातात, दुपारी भाजपची शेवभाजी खातात. रात्री काँग्रेसचं जेवण करतात. खातात कुणाचं मटण आणि दाबतात कुणाचं बटण हेच कळत नाही,''

आमदार संजय सावकारे, प्रशासक तथा प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, माजी नगराध्यक्ष रमण भोळे, जिल्हाप्रमुख समाधान महाजन, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, विश्वनाथ पाटील आदी उपस्थित होते.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारील शहरातील विविध भागात सहा कोटी 22 लाख रुपये किंमतीच्या विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. शहरातील श्रीनगर व जामनेर रोडवरील मान रेसीडेन्सीजवळ तसेच डी.एस.हायस्कूलमध्ये पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत विकासकामांचा शुभारंभ झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT