Shreeram Shete & Dada Bhuse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

शिवसेनेच्या मंत्र्याने प्रचार केला, तरीही `राष्ट्रवादी`चे श्रीराम शेटे जिंकलेच!

`कादवा`च्या निवडणुकीत राष्ट्रवादी विरोधात शिवसेना असे चित्र निर्माण झाले.

Sampat Devgire

दिंडोरी : कादवा सहकारी साखर (Kadwa sugar Factory) कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते श्रीराम शेटे (Shreeram Shete) यांचा पॅनल जिंकला. त्यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली. विशेष म्हणजे यानिमित्ताने त्यांच्या विरोधात शिवसेनेने (Shivsena) जोरदार मोर्चेबांधनी करीत पॅनेल उभे केले. राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे प्रचाराला आले, तरीही त्यांना खाते उघडता आले नाही.

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या कादवा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक तशी आगळीवेगळी झाली. श्रीराम शेटे यांनी कादवा कारखान्यात केलेल्या विकासाच्या जोरावर मतदान मागितले तर विरोधी पॅनल ने कादवाचा विकास हा खोटा असून विद्यमान अध्यक्ष व संचालक मंडळावर वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप केले होते. असे असले तरी सत्ताधारी गटातर्फे ऊसतोडीत होणारा विलंब व पुरेसा ऊस नसताना होणारे विस्तारीकरण हाच मुद्दा विरोधी पॅनलने वापरला, मात्र मतांची आकडेवारी बघता ज्या गावांमध्ये सर्वाधिक ऊस आहे अशा गावांमध्ये परिवर्तन पॅनलला अपेक्षित आघाडी मिळाली नाही.

२००७ च्या पहिल्या निवडणुकीत श्रीराम शेटे यांच्याविरोधात बाजीराव कावळे व डोखळे यांच्या दोन्ही पॅनलचा कडवा विरोध होता मात्र त्यावेळी तीन पॅनल असतानाही यामुळे श्रीराम शेटे यांचा विजय झाल्याचे गणित मांडत पुढील निवडणुकीत डोखळे व कावळे गट एकत्र येत एकत्रित पॅनल तयार करून श्रीराम शेटे यांच्या विरोधात आघाडी निर्माण केली मात्र दुसऱ्या निवडणुकीतही तो प्रयत्न अपयशी झाल्याने या वेळेत पुन्हा एकदा असाच काहीसा प्रयत्न केला. यात विरोधी गट पॅनल निर्मितीमध्ये कुठे कमी पडला नाही ही जमेची बाजू म्हणावी लागेल. सर्व गटांमध्ये रस्सीखेच बघावयास मिळाली. उमेदवारांना मिळालेली मते बघता विरोधी परिवर्तन पॅनलला कादवाच्या विकासात लक्ष घालण्यासाठी सभासदांनी कौल दिलेला दिसतो. परिवर्तन पॅनलच्या बहुतांशी उमेदवारांच्या गावांमध्ये उमेदवारांना पाहिजे ती आघाडी मिळाली नाही.

गेल्या काही वर्षांमध्ये कादवामध्ये सुरू असलेल्या प्रगतीला मतदारांनी कौल दिला असल्याचे चित्र दिसून आले. कादवाचे विस्तारीकरण व त्या जोडीला इथेनॉल व डिस्टीलरीसारखा महत्वकांक्षी प्रकल्प प्रगतिपथावर असल्याने भविष्यात कादवा चांगला विकास करेल असा विश्वास श्रीराम शेटे यांच्या नेतृत्वाने मतदारांनी दाखविला आहे. एकीकडे ऊसतोडीचे भांडवल करत व कादवा कारखान्यात विस्तारीकरणाच्या नावाखाली घोटाळा झाल्याचे दर्शवत परिवर्तन पॅनल ने मोठ्या प्रमाणात प्रचार केला असला तरी मतदारांनी त्याला धुडकावून लावत दृश्य परिस्थितीला प्रमाण मानत कादवा विकासला मतदान केले.

सत्ताधाऱ्यांना इशाराही...

इथेनॉल, डिस्टीलरी व विस्तारीकरण करून मोठ्या प्रमाणात कारखान्यात झालेले गाळप याचा संदर्भ देत विकासासाठी मतांची मागणी सत्ताधारी पॅनेलने केली. विरोधी परिवर्तन पॅनलने प्रचारासाठी केंद्रीय मंत्री भारती पवार व कृषीमंत्री दादा भुसे यांना प्रचारात उतरवून ही कोणत्याही प्रकारचा परिणाम मतदारांवर झालेला नाही. परिवर्तन पॅनलमध्ये उभी असलेली नवतरुणांची फळी व विरोधात तयार झालेला संपूर्ण पॅनल तसेच काही मुद्दे वगळता प्रचारात घेतलेली काही सक्षम मुद्दे यावर भविष्यात का होईना कादवा विकास पॅनलला नक्कीच बदल घरून आणावयास लावणारा आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT