Jaykumar Rawal & Amrishbhai Patel
Jaykumar Rawal & Amrishbhai Patel Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

शिवसेनेचे बंडखोर सरकार पाडणार अन् अमरिशभाई, रावल मंत्री होणार!

Sampat Devgire

धुळे : राज्यातील (Mahavikas Aghadi) सत्तासंघर्षात वेगाने बऱ्याच घडामोडी घडत आहेत. भाजप (BJP) आणि शिवसेनेच्या (Shivsena) बंडखोर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाची सत्तेकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे शिवसेनेचे आमदार सरकार पाडणार हे नक्की. त्याचा लाभ मात्र शिवसेनेच्या आमदारांना होण्याची शक्यता कमीच आहे. भाजपचे अमरिशभाई पटेल (Amrishbhai Patel) आणि जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांची मात्र मंत्रिमंडळात वर्णी लागेल, अशी अटकळ कार्यकर्ते बांधून आहेत. (Rebel Shivsena will fall down mahavikas Aghadi Government)

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमुळे हातची सत्ता जात असल्यामुळे महाविकास आघाडीच्या येथील नेते, पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. राज्यात कुणाची सत्ता येते, शिवसेनेच्या बंडखोरांसह अपक्ष व काही पक्षांच्या मिळून ५१ आमदारांनी स्वतंत्र गट म्हणून की अन्य पर्यायाने भाजपला पाठिंबा देण्याचे निश्‍चित केले आहे, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कोण होतो, अशा एक ना अनेक चर्चा राजकीय वर्तुळातही होत आहेत. भाजप व शिंदे गटाची सत्ता आली तर धुळे जिल्ह्यातून कुणाला मंत्रिपद मिळेल याचीही वर्तुळात उत्सुकता लागून आहे, तसेच चर्चाही रंगत आहे. किंबहुना, मंत्रिपदाच्या निवडीबाबत पैजाही लागत आहेत. काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपची वाट धरणारे ज्येष्ठ आमदार पटेल आणि तरुणांचे नेतृत्व करणारे आमदार रावल यांची नव्या मंत्रिमंडळात निश्‍चित वर्णी लागेल, अशी अटकळ स्थानिक कार्यकर्ते बांधून आहेत.

आमदार पटेल यांची कारकीर्द

आमदार पटेल काँग्रेसमध्ये असताना २००३- २००४ ला शालेय शिक्षण, क्रिडा, सांस्कृतिक खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाची योजना ही आमदार पटेल यांनी मंत्री असताना लागू केली. जिल्ह्याच्या वैभवात भर घालणारे धुळे शहरातील जिल्हा क्रिडा संकुल, नंतर शिरपूरचा सर्वांगिण विकासात चेहरामोहरा बदलवत जलसंधारणाच्या शिरपूर पॅटर्नव्दारे राष्ट्रीय पातळीवर वेगळी छाप निर्माण करणारे आमदार पटेल यांचे मंत्रिमंडळात वर्णी लागण्यासाठीचे पारडे जड मानले जाते. ते गेल्या साडेतीन दशकापासून राजकारणात स्थिरावले आहेत. त्यांनी नगराध्यक्ष, आमदारकीच्या निवडणुकीत पराभव कधीही पाहिला नाही.

आमदार रावल यांचा धडाका

गेल्या वेळी भाजपप्रणीत सत्तेत आमदार रावल यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली. त्यांच्याकडे रोहयो, पर्यटन खात्याचा भार होता. मिळालेल्या दीड ते दोन वर्षांच्या संधीत त्यांनी दोंडाईचाचा विकासात्मक चेहरामोहरा बदलण्यासाठी पुढाकार घेतला. रोहयोच्या माध्यमातून विक्रमी सिंचन विहीरी शेतकऱ्यांना मिळवून दिल्या. सारंगखेडा यात्रा ग्लोबल करण्याचा प्रयत्न केला. बुराई परिक्रमेव्दारे आणि मंत्रिपदाच्या संधीतून त्यांनी विकास कामे मंजूर करून घेत अवर्षणग्रस्त व कोरडवाहू शिंदखेडा तालुका, अशी ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न केला.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT