पुणे : शिवसेनेत (Shivsena) बंडखोरांना चर्चेचा प्रस्ताव देण्याची पद्धत नाही, असे सात दिवसांपूर्वी सांगणाऱ्या शिवसेनेच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी गुवाहाटीतील बंडखोरांना आज परत येण्याचे आवाहन केले. सात दिवसांपूर्वी ताठर भूमिका घेणाऱ्या शिवसेनेची भूमिका आज कशी व का बदलली अशी चर्चा सुरू झाली आहे. सरकार पडण्याऐवजी बंडखोरांशी चर्चा करून पर्याय निघतो का हे पाहण्याचा मुख्यमंत्री ठाकरे यांचे प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे.
विधान परिषद निवडणुकीनंतर मोजक्या पाठीराख्यांसह बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी सुरत गाठली. त्यानंतर त्यांच्याकडील आमदारांची संख्या दरदिवशी वाढत गेली.आज गुवाहाटीत शिवसेनेचे ३९ व अपक्ष व छोट्या पक्षांचे ११ मिळून ५० आमदार आहेत. बंड झाल्यानंतर शिवसेनेची भूमिका अत्यंत ताठर होती. २२ जूनला पक्षाच्यावतीने बोलताना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी बंडखोरांना चर्चेचा प्रस्ताव देण्याची शिवसेनेत पद्धत नाही, असे सांगितले होते.
पक्षाच्या बैठकीनंतर बंडखोर शिंदे यांना विधी मंडळातील गटनेतेपदावरून हटवत त्यांच्या जागी अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली. यावरून एकनाथ शिंदे कमालीचे नाराज झाले. त्यानंतर त्यांच्याकडे येणाऱ्या आमदारांची संख्या वाढत राहिली. अगदी बंडखोरांवर काय कारवाई करायची यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकांना हजर राहिलेल्या अनेक आमदारांनी त्यानंतर गुवाहाटी गाठली.
आठवड्याभरात अनेक घडामोडी घडल्या. सर्वोच्च न्यायालयानेदेखील बंडखोरांना काहीसा दिलासा दिल्यानंतर बंडखोरांचा गट अधिक आक्रमक झाला आहे. न्यायालयाच्या निकालानंतर भारतीय जनता पार्टीकडून सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. त्यामुळे राज्य सरकार काहीसे दबावाखाली आले असून त्यातून बंडखोरांना आज पुन्हा आवाहन करण्यात आल्याचे राजकीय तज्ञांचे मत आहे. एकिकडे मंत्रीमंडळाने मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर विश्वास दाखविला असला तरी सरकार अल्पमतात आल्याची जाणीव मुख्यमंत्री ठाकरे यांना झाल्याचे हालचालींवरून दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.