Vijay Karanjkar 
उत्तर महाराष्ट्र

Shiv Sena Nashik Politics: शिवसेनेत अंतर्गत कुरघोडीचे राजकारण पेटलं! करंजकरांना एकटं पाडलं...

Nashik Lok Sabha Constituency 2024: करंजकर हे अपक्ष लढणार , अशा वावड्या त्यांचे समर्थक पसरवत आहेत. लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी कशी असते हे सांगण्याची आवश्यकता नाही. कदाचित करंजकर यांच्या हितशत्रूंना तेच हवे असेल.

Sampat Devgire

Nashik loksabha 2024: नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेकडून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यानंतर लोकसभा संपर्क नेते विजय करंजकर (Vijay Karanjkar) यांनी नाराजी व्यक्त केली. त्या नाराजीनंतर कोणीही त्यांना गांभीर्याने घेऊ नये, अशी भूमिका शिवसेनेच्या (Shivsena Nashik Politics) स्थानिक नेत्यांनी घेतली आहे.

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कुरघोडीचे राजकारण नाशिकसाठी नवे नाही. नाशिक रोडमधील दोन नेत्यांतील कुरघोडीमुळे माजी मंत्री बबन घोलप यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांची कोणीही दखल घेतली नाही. त्यात ते एकटे पडले. अशीच काहीशी अवस्था शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांची होते की काय असे दिसते. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतदेखील शिवसेनेचे स्थानिक नेते एकमेकांना दूर लोटण्यात धन्यता मानत आहेत. त्यामुळे हा चर्चेचा विषय आहे. त्याचा फटका निवडणुकीत उमेदवाराला बसू शकतो.(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विजय करंजकर हे पक्षाचे जिल्हाप्रमुख होते. निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेनेने संघटनात्मक बदल केले. त्यामध्ये करंजकर यांची जिल्हाप्रमुख पदावरून लोकसभा संपर्कप्रमुख अशी नियुक्ती झाली. हा बदल राजकीयदृष्ट्या बोलका होता. यापूर्वी राजाभाऊ गोडसे हे जिल्हाप्रमुख होते. १९९६ मध्ये पक्षाने त्यांना उमेदवारी दिली. ते निवडून आल्यानंतर जिल्हाप्रमुखपद विनायक पांडे यांना देण्यात आले.

करंजकर यांचे जिल्हाप्रमुखपद निवडणुकीआधीच काढून घेण्यात आले. हा संदेश बरेच काही सांगून जातो. करंजकर हे सातत्याने अन्य पदाधिकाऱ्यांना योग्य वागणूक देत नाहीत. त्यांच्याकडे जाणाऱ्या कार्यकर्त्यांना सन्मान मिळत नाही. यापूर्वीच्या विधानपरिषद निवडणुकांमध्ये त्यांची भूमिका काय होती? जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारी देतानादेखील त्यांच्याबाबतच्या तक्रारी वरिष्ठांपर्यंत पोहोचविण्यात आल्या. अशा परिस्थितीत नाशिकच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी त्यांना एकटे पाडण्याची खेळी तर केली नाही ना? ही चर्चा जोरात आहे.

माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर करंजकर यांनी घेतलेली पत्रकार परिषद तर या सर्व घटनांना कारणीभूत नाही ना? अशी ही चर्चा आहे. दोन दिवसात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करंजकर यांना भेटणार होते. मात्र गेल्या आठवडाभरात करंजकर यांना मातोश्रीकडून बोलावणे आलेले नाही. करंजकर स्थानिक कोणत्याही नेत्यांच्या संपर्कात नाहीत. ते स्थानिक नेत्यांचे फोनही घेत नाहीत, असे एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर स्थानिक पदाधिकाऱ्यांत कुरघोडीच्या राजकारणाला उकळ्या फुटत आहेत. हे सर्व पदाधिकाऱ्यांच्या व्यक्तिगत हेतू साध्य करतील. मात्र पक्षाला मारक ठरतील, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

नाशिक शिवसेनेत सध्या उपनेते सुनील बागुल, महानगर प्रमुख विलास शिंदे, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, संपर्क नेते जयंत दिंडे, दत्ता गायकवाड असे विविध नेते आहेत. या नेत्यांनी पुढाकार घेऊन करंजकर यांची समजूत घालणे शक्य आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. स्थानिक नेतेच करंजकर यांना भेटत नाहीत. दुसरीकडे करंजकर यांना शिवसेना पक्षप्रमुखांनाच भेटण्याचा हट्ट आहे. त्यामुळे उमेदवार वाजे यांचीही कोंडी झाली आहे. त्यांना पदाधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय करंजकर यांच्याशी थेट संपर्क करणे शक्य होत नाही. शिवसेना ठाकरे गटातील ही कोंडी लोकसभा निवडणुकीत पक्षाला काय वळणावर नेते याचीच कार्यकर्त्यांत चर्चा आहे.

करंजकर हे अपक्ष लढणार , अशा वावड्या त्यांचे समर्थक पसरवत आहेत. लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी कशी असते हे सांगण्याची आवश्यकता नाही. कदाचित करंजकर यांच्या हितशत्रूंना तेच हवे असेल. करंजकर हे नाशिकच्या ग्रामीण भागातील एक वजनदार नेतृत्व आहे. त्यांना राजकीय भवितव्य आहे. त्यामुळे ते काय निर्णय घेतात, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

Edited by: Mangesh Mahale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT