Eknath Shinde & Devendra Fadanvis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाचा समन्वयावर भर!

Sampat Devgire

Mahayuti Politics : भारतीय जनता पक्षाने राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांत लोकसभेची निवडणूक तयारी सुरू केली आहे. त्याच पावलावर पाऊल ठेवत शिवसेनेच्या शिंदे गटाने ३९ मतदारसंघांसाठी निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. हे निरीक्षक महायुतीत समन्वयावर भर देणार आहेत. (Shivsena Shinde Group active after four states election results)

भाजपने (BJP) राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी मिशन ४५ जाहीर केले आहे. या पार्श्वभूवर महायुतीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने (Shivsena) (शिंदे गट) (Eknath Shinde) देखील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) (Ajit Pawar) गटाच्या नेत्यांत समन्वय निर्माण करील.

राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांतील आठ मतदारसंघांसाठी मुख्यमंत्री शिंदे गट उद्या (ता. ८) निरीक्षक नियुक्त करण्याची शक्यता आहे. पक्षाचे हे सर्व निरीक्षक प्रामुख्याने मतदारसंघात महायुतीच्या नेत्यांमध्ये समन्वय प्रस्थापित करण्यावर भर देणार आहेत. त्यासाठी आगामी काळात सातत्याने बैठका घेतल्या जाणार असल्याचे पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी यांनी सांगितले.

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड व मिझोरम या राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत यश प्राप्त झाले. लोकसभेची सेमीफायनल जिंकल्याने विश्वास दुणावलेल्या भाजपने लोकसभेसाठी तयारी सुरू केली आहे. राज्यातील ४८ जागांपैकी कोणत्या पक्षाने किती जागा लढवायच्या, हे अद्याप निश्चित झाले नसताना शिवसेनेच्या शिंदे गटाने ४८ जागांवर लक्ष केंद्रित केल्याची घोषणा केली आहे.

नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावर शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. नाशिक लोकसभा संपर्कप्रमुख जयंत साठे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, लोकसभा संघटक योगेश मस्के, युवा सेना विस्तारक योगेश बेलदार, महिला आघाडी जिल्हा सहसंपर्कप्रमुख सुवर्णा मटाले, महानगर संघटक अस्मिता देशमाने आदी या वेळी उपस्थित होते.

आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने प्रामुख्याने नाशिक पूर्व, पश्चिम, मध्य, देवळाली, त्र्यंबक, इगतपुरी, सिन्नर विधानसभेच्या शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, युवती सेना, अंगिकृत संघटना पदाधिकाऱ्यांच्या सोबत पुढील निवडणुकांच्या संदर्भात शिवसेना नाशिक जिल्ह्याची तयारी कुठपर्यंत आली आहे, पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका पूर्ण करणे, बूथप्रमुखांची नियुक्ती, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी केलेल्या सर्व जनहिताची कामे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोचविण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT