Chandvad Politics News: विधानसभा निवडणुकीत चांदवड मतदारसंघात अनेक घडामोडी घडल्या. कागदावर एकत्र असलेली महाविकास आघाडी प्रत्यक्षात मात्र दुभंगलेली होती. त्यामुळे काँग्रेसला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते.
विधानसभा निवडणुकीत भाजपचे विद्यमान आमदार डॉ राहुल आहेर तिसऱ्यांदा विजयी झाले. मात्र त्यांची लढत काँग्रेसचे शिरीषकुमार कोतवाल यांच्या ऐवजी 'प्रहार'चे गणेश निंबाळकर यांच्याशी झाली. यामध्ये महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष किती मनापासून काँग्रेस बरोबर होता याची चर्चा सुरू झाली होती. निवडणुकीत काँग्रेसला अवघे वीस हजार मते मिळाली होती.
विशेष म्हणजे चांदवड बाजार समितीचे सभापती काँग्रेसचे संजय जाधव यांनीही उमेदवारी मागितली होती. उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी काँग्रेस ऐवजी अन्य उमेदवाराला सहकार्य केले. त्यामुळे निवडणुकीनंतर त्यांच्या सभापती पदावर गंडांतर येणार हे निश्चित होते.
तशा राजकीय हालचाली सध्या सुरू झाल्या होत्या. त्यामुळे संजय जाधव यांनी यापूर्वीच सभापती पदाचा राजीनामा दिला होता. सहकार उपनिबंधकांनी त्याला मंजुरी देखील दिली होती. केवळ तांत्रिकदृष्ट्या ते पदावर होते. त्यांच्या विरोधात दोन दिवसांपूर्वी अविश्वास ठराव मंजूर झाला. या निमित्ताने घडलेल्या राजकीय घडामोडी चर्चेचा विषय ठरला आहे.
श्री. जाधव यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर व्हावा म्हणून भाजपच्या तीन संचालकांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. येत्या निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नितीन आहेर हे सभापती होणार आहेत. त्यामुळे भाजपच्या तीन संचालकांनी शिवसेना ठाकरे पक्षाला दिलेला पाठिंबा आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला केलेले सहकार्य आगामी निवडणुकांच्या दृष्टीने तालुक्यात वेगळ्या राजकीय खिचडीची सुरुवात तर नाही ना? अशी चर्चा सुरू आहे.
चांदवड बाजार समितीत १८ सदस्य आहेत. यामध्ये डॉ आत्माराम कुंभार्डे, मावळते सभापती संजय जाधव, सुखदेव जाधव, वाल्मीक वानखेडे आणि सुशीला पलोड हे पाच संचालक आता विरोधी गटात आहेत. ,प्रहार'चे गणेश निंबाळकर यांसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे पक्ष आणि भाजपच्या प्रत्येकी तीन अशा तेरा सदस्यांचा गट तयार झाला आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे नितीन आहेर आगामी सभापती असतील.
ही विचित्र राजकीय युती चर्चेचा विषय ठरली आहे. आज बाजार समितीच्या राजकारणात जे घडले तेच छुप्या पद्धतीने विधानसभा निवडणुकीत घडले नसावे ना? ही सामान्य कार्यकर्त्यांची शंका आहे. भाजपकडून हे विधानसभेचे रिटर्न गिफ्ट शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला मिळाले असल्यास नवल नाही.
-------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.