Shivsena Nashik Political News : नाशिकमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिवशी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अधिवेशन होत आहे. तीस वर्षांनी नाशिकमध्ये होणाऱ्या या अधिवेशनातून शिवसेना एक नवी आक्रमक शिवसेना उभी करण्याचा उद्देश आहे. आगामी लोकसभेला सामोरे जाताना आजच्या विषयपत्रिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे मुख्य टार्गेट असणार आहेत.
देशात चारशे आणि महाराष्ट्रात 45 जागांचे उद्दिष्ट घेऊन लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या भाजपच्या मार्गात सर्वात मोठा अडथळा आजही शिवसेना आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेना फोडण्याचा डाव टाकूनही भाजपसमोर शिवसेनेचे आव्हान कायम आहे. किंबहुना महाराष्ट्रातील जनतेमध्ये शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विषयीची सहानुभूती अधिक वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आज नाशिक येथे शिवसेनेचे अधिवेशन होत आहे.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नाशिकमध्ये येताच स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला भेट दिली. श्री काळाराम मंदिरात दर्शन घेतले. गोदावरी आरती केली. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सर्वांमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखी लकब, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, असे नवे रुप उद्धव ठाकरेंनी धारण केले आहे.
ते शिवसैनिकांमध्ये चर्चेचा विषय आहे. त्यामुळे आजच्या अधिवेशनातून उद्धव ठाकरे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त एक नवी आक्रमक शिवसेना घडविण्यासाठी नवा अध्याय लिहिणार का? याची उत्सुकता आहे.
अधिवेशनाला शिवसेनेचे सर्व नेते आणि खासदार, आमदार, माजी आमदार, जिल्हाप्रमुख तसेच निमंत्रित सदस्य उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेचे फायरब्रँड नेते यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.
यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत पाडलेली फूट पक्ष चिन्ह ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा केलेला दुरुपयोग, सध्या सत्तेचा वापर करून शिवसेनेच्या नेत्यांना दाखविण्यात येणारी आमिषे, हा अत्यंत महत्त्वाचा विषय असणार आहे.
नुकताच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी शिवसेनेच्या 16 बंडखोरांबाबत दिलेला निर्णय हा दुसरा महत्त्वाचा विषय असेल. त्यावर नेते उपस्थित त्यांना मार्गदर्शन करून आगामी काळात भाजप आणि या नेत्यांना लोकसभा निवडणुकीत प्रामुख्याने लक्ष्य करण्याचे निर्देश देणार आहेत, असे कळते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना महाविकास आघाडी अर्थात इंडिया आघाडीचा घटक पक्ष म्हणून शिवसेना सामोरा जाणार आहे. याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपली भूमिका मांडतील.
आगामी निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी एक नवा उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी हे अधिवेशन होत आहे. त्यात पक्ष किती यशस्वी होतो याची सबंध देशातील राजकीय भाष्यकारांना उत्सुकता आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.