नाशिक : गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील दोन उड्डाणपुलांच्या वादाने न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्यानंतर आता बीओटीवर भूखंड विकसित करण्याच्या भाजपच्या (BJP) मागच्या दाराने मंजूर प्रस्तावांचे प्रकरण पेटणार आहे.
सोमवारी बांधकाम विभागाने चार भूखंडांचा विकास करण्यासाठी काढलेल्या निविदेत स्वा. सावरकर स्मारकाची जागादेखील असल्याचा संशय शिवसेनेकडून (Shivsena) व्यक्त करण्यात आल्याने बीओटी वाद निवडणुकीत गाजण्याची चिन्हे दिसू लागली आहे. या विरोधात महापालिकेचे (NMC) विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते (Ajay Boraste) यांनी मागच्या दाराने मंजूर केलेल्या प्रस्तावांविरोधात थेट शासनाकडे दाद मागण्याचा इशारा देताना निवडणुकीपूर्वी भाजप विरोधात दंड थोपटले.
शहरातील मोक्याच्या जागेवरील मिळकती बीओटीवर विकसित करताना महासभेला कुठलीही कल्पना न देता ठराव क्रमांक ५३० द्वारे मंजूर करण्यात आला. त्यात एकूण २२ मोक्याच्या मिळकती बीओटीवर विकसित करण्याच्या गोंडस नावाखाली खासगी मक्तेदारांच्या घशात घातल्या जात आहे. शिवसेनेने यापूर्वी विरोध केल्यानंतर नव्याने ठराव क्रमांक क्रमांक ११८७ अन्वये शरणपूर रोड, कॅनडा कॉर्नर, सावरकर नगर, कारंजा आदी अत्यंत मोक्याच्या जागा मिळकती बीओटीवर विकसित करण्याचा प्रस्तावदेखील अशासकीय ठरावाद्वारे मंजूर केला.
ही बाब खेदजनक असून, भाजपने शहरच बिल्डर लॉबीला विक्रीला काढल्याचा आरोप श्री. बोरस्ते यांनी केला. जागा विकसित करताना स्थानिक रहिवाशांचे मत विचारात घेणे आवश्यक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. परंतु विशिष्ट विकासकांना हाताशी धरुन नियोजनबद्ध पद्धतीने महापालिकेच्या मालमत्तेवर दरोडा टाकण्याचे प्रयत्न होत आहे. प्रशासनाकडूनदेखील मदत होत असल्याचा आरोप श्री. बोरस्ते व गटनेते विलास शिंदे यांनी करताना शासनाकडे दाद मागणार असल्याचे सांगितले.
मनसे जाणार न्यायालयात
मोक्याच्या जागा बीओटीवर विकसित करण्याच्या सत्ताधारी भाजपच्या भूमिकेला मनसेने विरोध करताना नगरसेवक सलीम शेख यांनी महापालिका आयुक्तांना पत्र देत अशासकीय ठरावावर कार्यवाही न करण्याची मागणी केली आहे. सदरचा प्रस्ताव महापालिकेच्या हिताविरोधात असल्याने तत्काळ शासनाकडे विखंडनासाठी सादर करून निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी केली. प्रस्ताव रद्द न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा देण्यात आला.
----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.