नाशिक : भारताने १६५ कोटी लसीकरणाचा (Vaccination) टप्पा पार केला आहे. आजवर हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच देशांनी स्वत:ची लस विकसित केली आहे. कोरोना विरोधातील लढ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली देशाचा हा प्रवास अगतिकतेकडून आश्वासकतेकडे झाल्याचे उदाहरण आहे, असे केंद्रीय आरोग्य व परिवार कल्याण राज्यमंत्री डॅा भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या, लोकसहभागातून नागरिक आणि सरकार समान ध्येयासाठी एकत्र आले तर आपण काय मिळवू शकतो, याचे कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम हे पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील हे उत्तम उदाहरण आहे. आपला देश अधिक सामर्थ्यवान बनला आहे, जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेचा हा परिणाम आहे, असेही त्यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या, देशाने १०० कोटी लसीकरणाचा टप्पा केवळ नऊ महिन्यात गाठला. या महामारीला तोंड देताना २०२० वर्षाच्या प्रारंभी जी स्थिती निर्माण झाली त्याचा विचार करता लसीकरणाची उपक्रम असाधारण म्हणावा लागेल. सबंध जगाला शतकानंतर देशाला इतक्या भयंकर महामारिला तोंड द्यावे लागले. कोणालाही या कोरोना विषाणूची फारशी माहिती नव्हती. आपल्याला आठवत असेल, की तेव्हा सर्वांनाच अज्ञात व वेगाने पसरणाऱ्या कोरोना अदृश्य विषाणूला तोंड द्यावे लागले. त्यामुळे पुढे काय करायचे, काय होणार, असा संभ्रम होता. त्यामुळे भारत सरकारने राबविलेला उपक्रम खऱ्या अर्थाने भगीरथ प्रयत्न म्हणता येईल.
प्रारंभी पंतप्रधानांनी एक टास्क फोर्सची स्थापना केली. तज्ञांच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे निर्णय घेतले. त्यात रुग्ण शोधणे, त्यांची तपासणी, त्याचे अहवाल कोविड पोर्टल अपलोड करणे, संसर्गानुसार रुग्णांना त्रीस्तरीय उपचार मध्ये वर्ग करणे, औषधे, उपकरणे व ऑक्सिजन संदर्भात राज्यांच्या मुख्यमंत्री, अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे चर्चा करून आवश्यक ती सर्व मदत करण्यात आली. इसीआरपी १ व व इसीआरपी २ अंतर्गत राज्यांना भरघोस निधी देखील देण्यात आला. `पीएम केअर`च्या माध्यमातून व्हेंटिलेटर, पीएसए प्रकल्प, व अन्यउपकरणे पुरवली. पायाभूत वैद्यकीय सुविधांसाठी मोठी तरतूद करून कोविड केंद्रांची उभारणी झाली. पंतप्रधानांनी काही जिल्हाधिकारी, विभागीय अधिकारी किंवा शेवटच्या घटकांसोबत देखील वेळोवेळी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संभाषण केले, हे एक यशस्वी व सेवाभावी पंतप्रधानांचे उत्तम उदाहरण आहे. त्यात विरोधी पक्षांना देखील विश्वासात घेण्यात आले. त्यात काम करण्यासाठी आरोग्य राज्यमंत्री म्हणून जबाबदारी देऊन माझ्यावर एक मोठा विश्वास टाकला.
राज्यमंत्री डॅा. पवार म्हणाल्या, मला अभिमान आहे की आपल्या लाडक्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली व या विभागाचे मंत्री मनसुखभाई मांडवीया यांच्या सहकार्याने जगातील सर्वात मोठ्या महामारीचे संपूर्ण यशस्वी नियोजन व लसीकरण मोहिमेत मिळवलेले यश आपल्या युवकांना, नावीन्यपूर्ण संशोधन करणाऱ्यांना आणि सरकारच्या सर्व स्तरांना सार्वजनिक सेवा वितरणाचे नवीन मापदंड निश्चित करण्यासाठी प्रोत्साहित करेल. केवळ देशासाठीच नव्हे तर जगासाठीदेखील एक आदर्श ठरेल.
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.