Shrigonda farmer protest Ajit Pawar : अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण अलीकडच्या काळात चांगलेच गढूळ बनलं आहे. संगमनेर इथं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यावर काल गुरूवारी हल्ल्याचा प्रयत्न झाला.
यानंतर आता श्रीगोंदा इथं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित आयोजित शेतकरी मेळाव्यात त्यांच्या दिशेने कांद्याची माळ फिरकवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांकडे पोलिस चौकशी करत आहेत.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) श्रीगोंद्यातील स्थानिक दिग्गज नेत्यांनी प्रवेश केला आहे. माजी आमदार राहुल जगताप, शिवाजी नागवडे, घनश्याम शेलार यांनी अलीकडच्या काळात राष्ट्रवादीत प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी राहुरी इथं अरुण तनपुरे यांनी पक्ष प्रवेश करून अजित पवार यांच्या उपस्थित कार्यकर्ता मेळावा घेतला होता.
अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावेळी तनपुरे वाड्यावर हजेरी लावली होती. तसंच तनपुरे कुटुंबियांबरोबर स्नेहभोजन घेतले होते. यानंतर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि त्यांचे वडील प्रसाद तनपुरे अजितदादांच्या राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. परंतु या चर्चांना पुढं विराम देण्यात आला. यानंतर अजितदादा आता श्रीगोंद्यात शेतकरी मेळाव्यावनिमित्ताने आज दौऱ्यावर होते.
अजित पवार मेळाव्यात मार्गदर्शन केले. कांद्यावर बोलण्याची मागणी केली. मेळाव्यात गर्दी होती. याचवेळी दोघांनी बरोबर आणलेली कांद्याची माळ बाहेर काढली अन् अजितदादांच्या दिशेने गेले. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे आणि तालुका अध्यक्ष नाना शिंदे, या दोघांना काही कार्यकर्त्यांनी रोखल्यानंतर ही कांद्याची माळ त्यांनी अजितदादांच्या दिशेने फेकरण्याचा प्रयत्न केला. यामुळे मेळाव्यात काहीसा गोंधळ उडाला. पोलिसांनी प्रसंगावधान राखत, या दोघांना ताब्यात घेतलं. मेळाव्यातील गोंधळाची स्थिती नियंत्रणात आणली.
अजितदादांनी शेतकरी मेळाव्यात कांद्यावर एक शब्दही उच्चार नाही. त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्रातील आताची पूरस्थिती, पूर्वीची अवकाळी स्थिती यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. कांदा उत्पादन शेतकरी पूर्णपणे आर्थिक विवंचनेत अडकला आहे. यावर अजितदादा मेळाव्यात काहीच बोलले नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, विधिमंडळाच्या सभागृहात माणिकराव कोकटे कृषिमंत्री असताना आॅनलाइन रम्मी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला होता. यावर छावा संघटना राज्यभर आक्रमक झाली होती. लातूर इथं राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्यावर छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांनी पत्ते उधळले होते. यानंतर राष्ट्रवादीचे तत्कालीन प्रवक्ते सुरज चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विजय घाडगे यांना बेदम मारहाण झाली होती.
आता थेट अजितदादांच्या उपस्थित झालेल्या शेतकरी मेळाव्यात कांद्याची माळ फिरकवण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार घडला आहे. अलीकडच्या काळात अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण पार गढूळ बनलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संगमनेरमधील आमदार अमोल खताळ यांच्यावर काल गुरूवारी हल्ल्याचा प्रयत्न झाला. आमदार खताळ यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ आज संगमनेरमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला. आता अजित पवार यांच्या दिशेने कांदा माळ फिरकवण्याचा प्रयत्न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते काय भूमिका घेतात, याकडे आता लक्ष लागलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.