IRAD App Corruption Case Maharashtra : अपघात प्रकरणाची माहिती आयआरएडी (IRAD) ॲपमध्ये नोंदवून गुन्हा दाखल करण्यासाठी तब्बल सात हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहिल्यानगर पथकाने पकडत मोठी कारवाई केली.
एकाचवेळी तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई झाल्याने अहिल्यानगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) अहिल्यानगर पथकाने ही धडक कारवाई केली. नितीन अशोक गाडगे (44), रावसाहेब जाधव (38) आणि शासकीय वाहन चालक दादाराम शिवराम म्हस्के (56) अशी कारवाई झालेल्या तिघांची नावे आहेत. तिन्ही आरोपींविरोधात श्रीगोंदा पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या भावाचा 1 जून रोजी अपघात झाला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी दौंड येथे दाखल करण्यात आले होते. या घटनेनंतर दौंड पोलिसांनी (Police) जबाब नोंदवून पुढील कारवाईसाठी प्रकरण श्रीगोंदा पोलिसांकडे वर्ग केले. हे प्रकरण पोलिस कर्मचारी नितीन गाडगे याच्याकडे होते.
तपासादरम्यान नितीन गाडगे याने अपघाताची माहिती आयआरएडी ॲपमध्ये भरण्यासाठी त्याचा मदतनीस रावसाहेब जाधव याला भेटण्यास सांगितले. तक्रारदाराने संपर्क साधल्यानंतर रावसाहेब जाधव याने अपघाताची माहिती ॲपमध्ये भरून संबंधित गुन्हा दाखल करण्यासाठी स्वतःसह नितीन गाडगे यांच्यासाठी तब्बल 10 हजार रुपयांची लाच मागितली.
या मागणीबाबत तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अहिल्यानगर पथकाकडे तक्रार दाखल केली. पडताळणीदरम्यान तडजोडीनंतर सात हजार रुपयांवर व्यवहार ठरल्याचे स्पष्ट झाले. आरोपींनी ही रक्कम श्रीगोंदा पोलिस ठाण्यातील सरकारी वाहन चालक दादाराम म्हस्के याच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार आज सापळा रचण्यात आला आणि म्हस्के याने सात हजार रुपयांची लाच स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने तिन्ही आरोपींवर कारवाई केली.
या प्रकरणामुळे श्रीगोंदा पोलिस ठाण्याच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, एकाचवेळी तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई झाल्याने पोलिस विभागात मोठी खळबळ उडाली आहे. अलीकडच्या काळात अशा प्रकारची ही पहिलीच मोठी कारवाई मानली जात आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अहिल्यानगर पथकाचे निरीक्षक राजू आल्हाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक चंद्रकांत काळे, कॉन्स्टेबल किशोर कुळधरण, शेखर वाघ आणि दशरथ लाड यांच्या पथकाने यशस्वी केली. दरम्यान, कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याकडून किंवा लोकसेवकाकडून लाच मागितली जात असल्यास नागरिकांनी त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाने केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.