Shrirampur bandh over Akash Dubayye murder Case sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shrirampur Crime Protest :'टोपीपेक्षा भगव्या उपरण्याचीच भीती'; श्रीरामपूर हत्याकांडानंतर भाजपच्या महिला नेत्याचे खळबळजनक विधान

Leaders make explosive statements as Shrirampur bandh over Akash Dubayye murder enters second day : आकाश दुबय्या हत्या प्रकरणानंतर सलग दुसऱ्या दिवशी श्रीरामपूर बंद; वैशाली चव्हाण, हेमंत ओगले, प्रकाश चित्ते, भाऊसाहेब कांबळे यांचे पोलिस प्रशासन आणि गुन्हेगारीवर थेट हल्लाबोल, मकोकाचीही जोरदार मागणी.

Pradeep Pendhare

Shrirampur Crime Protest : श्रीरामपूर शहरात शनिवारी भरदुपारी झालेल्या हॉटेल व्यावसायिक आकाश दुबय्या यांच्या निर्घृण हत्येनंतर दुसऱ्या दिवशी देखील संतापाची तीव्र लाट कायम आहे. हत्येच्या निषेधार्थ सलग दुसऱ्या दिवशीही श्रीरामपूर शहर आणि परिसर बेमुदत बंद ठेवण्यात आला. आज बंदच्या दुसऱ्या दिवशी आंदोलनात सहभागी झालेले सर्वपक्षीय नेत्यांनी श्रीरामपूर शहरातील गुन्हेगारीविषयी खळबळजनक विधाने केली. नगरपालिकेतील भाजपच्या गटनेत्या वैशाली चव्हाण आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते प्रकाश चित्ते यांनी, आक्रमक पवित्रा घेतला. भाजपच्या चव्हाण यांनी, 'आता टोपीपेक्षा भगव्या उपरण्याचीच भीती वाटू लागली आहे', असे विधान केले. तर शिवसेनेचे प्रकाश चित्ते यांनी, 'हिंदू गुंडांपासूनच हिंदू समाजाचे संरक्षण करण्याची वेळ आली आहे' असे म्हणत महायुतीच्या हिंदुत्वाला आव्हान दिले.

वैशाली चव्हाण श्रीरामपूर (Shrirampur) नगरपालिकेत भाजपच्या नगरसेविका असून, त्या गटनेते पदावर विराजमान आहे. आकाश दुबय्या यांच्या निर्घृण हत्येनंतर त्यांनी श्रीरामपूरमधील गुन्हेगारीविरोधात चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. त्या म्हणाल्या, "श्रीरामपूर शहरात दिवसाआड हाफ मर्डर, मर्डर, घरफोड्या आणि मुली पळवून नेण्याचे प्रकार सुरू आहेत. महिलांवर अत्याचार होत असूनही लोक भीतीने पुढे येत नाहीत. पोलिसांकडे गेल्यावर दखल घेतली जात नाही. आता शहरात टोपीपेक्षा भगव्या उपरण्याचीच भीती वाटू लागली आहे, अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे."

काँग्रेस आमदार हेमंत ओगले यांनी माध्यमांसमोर अत्यंत खळबळजनक अन् थेट आरोप केले आहेत. श्रीरामपूर शहरात केवळ गुन्हेगारीच (Crime) वाढली नाही, तर इथे 'बेग टोळी' सक्रिय असून याच टोळीच्या अंडर सर्व काळे धंदे आणि हैदोस सुरू आहे, असा थेट आरोप करत पोलिस प्रशासनाचे वाभाडे काढले.

नगराध्यक्ष करण ससाणे यांनी, पोलिसांना राजकीय दबावमुक्त वातावरण मिळाले, तर संघटित गुन्हेगारीवर प्रभावी कारवाई होऊ शकते. पोलिसांचे स्वातंत्र्य अबाधित राहणे गरजेचे आहे, हे सांगताना काँग्रेसचे सरकारच्या काळात दिवंगत नेते जयंत ससाणे साहेब आमदार आणि शिर्डी संस्थांचे अध्यक्ष असतानाही त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला होता, याची आठवण करून दिली.

'हिंदू समाजाच्या संरक्षणाची गरज'

प्रकाश चित्ते यांनी, नेहमी हिंदुत्वाच्या नावाखाली राजकारण केले जाते. मात्र आता हिंदू गुंडांपासूनच हिंदू समाजाचे संरक्षण करण्याची वेळ आली आहे. मृत आकाश दुबय्या हा देखील हिंदू होता आणि त्याला मारणारेही हिंदूच आहेत. मग हे गुंड कोणाचे संरक्षण करत आहेत? गेल्या दीड-दोन वर्षांत अनेक मुली बेपत्ता झाल्या. ड्रग्जचे साठे सापडले. मात्र पोलिसांकडून ठोस तपास झाला नाही. या आंदोलनाद्वारे आमची मागणी आहे की गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्यांवरही मकोका लावला पाहिजे, असा घणाघात केला.

कांबळे म्हणाले, बंद सुरूच राहणार

माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनीही, प्रशासनावर आणि छुप्या राजकीय पाठिंब्यावर टीका केली. या गुंडगिरीला प्रशासन आणि छुपी राजकीय शक्ती जबाबदार आहे. अशा गुंडांना पोसल्यामुळेच त्यांचे धाडस वाढले आहे. राहुरी, शिर्डी भागातून इथे नशेचे ड्रग्ज आणि इंजेक्शन सप्लाय होतात. जोपर्यंत यावर ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन आणि श्रीरामपूर बंद सुरूच राहील, असा इशारा दिला.

पालकमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारावी

माजी खासदार सदाशिव लोखंडे, आता सर्व राजकीय पक्षांनी हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र येण्याची आणि या दादागिरीचा कायमचा अंत करण्याची गरज आहे, असे म्हटलं. माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी पालकमंत्र्यांनीही जबाबदारी स्वीकारून आवश्यक ते प्रशासकीय बदल केल्यास गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळविता येईल, अशी भूमिका मांडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT