

Shrirampur Crime : जेवण उशिरा मिळाल्याच्या कारणावरून हॉटेल मालक आकाश चंद्रशेखर उर्फ शेखर वेंकटरमन दुबय्या (वय 34) यांची भरदिवसा हत्या झाल्यानंतर श्रीरामपूरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.
या घटनेच्या निषेधार्थ आज शहरात बंद पाळण्यात आला असून, व्यापारी आणि नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दुबय्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी श्रीरामपूरमधील वाढत्या गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त करत, "श्रीरामपूर क्राईमचं कॅपिटल होत आहे," अशी गंभीर टिप्पणी केली.
श्रीरामपूर (Shrirampur)-नेवासा मार्गावरील हॉटेल लक्ष्मीनारायण अँड लॉजिंग येथे शनिवारी भरदिवसा आकाश दुबय्या यांची हत्या झाली. या घटनेमुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शहरात बेमुदत बंदची हाक देण्यात आली आहे. काही स्थानिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीरामपूरला भेट द्यावी, अशी मागणीही केली आहे.
विखे पाटील म्हणाले की, वाढत्या गुन्हेगारीला कुणाचे पाठबळ मिळत आहे, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. "गुन्हेगारांना कोण आश्रय देत आहे आणि त्यांना कोणाचा आशीर्वाद आहे, याचा तपास व्हायला हवा. याबाबत मी पोलिस महासंचालकांशी तसेच मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढली पाहिजेत," असे त्यांनी सांगितले.
घटनेनंतर आरोपींना संरक्षण देण्यासाठी रुग्णालयात मोठ्या संख्येने लोक जमा झाल्याचा उल्लेख करत त्यांनी नाराजी व्यक्त केली. "गुन्ह्यानंतर आरोपींना संरक्षण देण्यासाठी लोक रुग्णालयात जमा होतात, असा अनुभव यापूर्वी कधी आला नव्हता. ही अत्यंत गंभीर बाब आहे," असे ते म्हणाले.
गुन्हेगारांना जात, धर्म किंवा पंथ नसतो, त्यामुळे पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता कठोर कारवाई करावी, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच, हा प्रकार केवळ वैयक्तिक वादापुरता मर्यादित नसून, त्यामागे अवैध धंद्यांचे जाळे असण्याची शक्यता तपासली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
विखे पाटील यांनी पुढे सांगितले की, शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाला आवश्यक ते सर्व अधिकार देण्यात आले आहेत. गुन्हेगारीविरोधात व्यापक मोहीम राबवून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येईल. त्यानंतरच नागरिकांच्या मनातील भीती दूर होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.