Eknath Shinde Sena Leader Attack: Corporator Among 9 Accused in Firing Case Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shiv Sena Leader Attack : रॉड, दांडके, पिस्तुल अन् गँगवॉरचा अँगल? एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या युवा नेत्यावर गोळीबारात नगरसेवकासह नऊ जणांविरोधात गुन्हा

Shiv Sena youth leader gun attack investigation: श्रीरामपूर शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली असून, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे युवा विधानसभा संघटकावर गोळीबार झाला आहे.

Pradeep Pendhare

Shrirampur Gang Rivalry : श्रीरामपूर शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे युवा विधानसभा संघटक प्रशांत देवीदास कहाणे (वय 31) यांच्यावर 6 ते 7 जणांच्या टोळीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

विशेष म्हणजे, हल्लेखोरांनी कहाणे यांच्या चालत्या स्कॉर्पिओवर गोळीबार केल्याचीही जोरदार चर्चा असून, या प्रकरणामुळे शहरातील राजकीय आणि गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, प्रशांत कहाणे हे सोमवारी रात्री बेलापूर-श्रीरामपूर (Shrirampur) मार्गावरील एका मोबाईल दुकानातून काम आटोपून आपल्या पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून गोंधवणी येथील घराकडे निघाले होते. रात्री सुमारे 9.40 वाजता ते गोंधवणी रस्त्यावरील एज्युकेशन शाळेजवळ पोहोचले असता, रस्त्यावर दोन दुचाकी आडव्या लावून काही जण उभे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

या टोळीतील (GangSter) सदस्यांच्या हातात लाकडी दांडके, लोखंडी रॉड होते, तर एका संशयिताकडे बंदुकीसारखे हत्यार असल्याचे सांगितले जात आहे. कहाणे यांनी पुढे जाण्याचा प्रयत्न करताच टोळीने त्यांच्या गाडीवर अचानक हल्ला चढवला. गाडीवर दांडके आणि लोखंडी रॉडने जोरदार प्रहार करण्यात आले.

जीवाला धोका असल्याचे लक्षात येताच कहाणे यांनी प्रसंगावधान राखत स्कॉर्पिओ वेगाने पुढे दामटली आणि गोंधवणीमार्गे सुतगिरणी फाटक ओलांडत थेट शहर पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. मात्र हल्लेखोरांनी त्यांचा सुतगिरणी फाटक परिसरापर्यंत पाठलाग केल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलिस ठाण्यात पोहोचल्यानंतर कहाणे यांनी आपल्या वाहनाची पाहणी केली असता, ड्रायव्हर सीटच्या खालच्या भागात एक संशयास्पद छिद्र आढळून आले. या छिद्रामुळे हल्ल्यादरम्यान गाडीवर गोळीबार झाल्याची चर्चा अधिकच रंगली आहे. तथापि, हे छिद्र गोळीबारामुळे पडले की अन्य कोणत्या तीक्ष्ण हत्याराच्या प्रहारामुळे निर्माण झाले, याबाबत पोलिसांकडून अधिकृत तपास सुरू आहे.

दरम्यान, या हल्ल्यामागे श्रीरामपूरमधील दोन गटांतील जुना वाद कारणीभूत असल्याची चर्चा सुरू आहे. स्थानिक पातळीवर मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत कहाणे यांचा पूर्वी गोंधवणी परिसरातील एका गटाशी संबंध होता. काही काळापूर्वी त्यांनी तो गट सोडून दुसऱ्या गटात प्रवेश केल्याने निर्माण झालेल्या वादातून हा हल्ला घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक जयदत्त भवर आणि पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत पाहणी केली. या प्रकरणी प्रशांत कहाणे यांच्या फिर्यादीवरून अपक्ष नगरसेवक अर्जुन दाभाडे, किरण बोरकर, विकी ढमके, नमोद कांबळे, विवेक दाभाडे तसेच इतर 4 ते 5 जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT