Shrirampur news : श्रीरामपूरच्या हरेगाव येथील मतमाऊली यात्रेदरम्यान खंडित झालेला वीजपुरवठा आणि व्हॉट्सॲप ग्रुपवरील मेसेजवरून झालेल्या वादातून महावितरणचे कंत्राटी वायरमन पंकज खरात यांना लोकप्रतिनिधीच्या अंगरक्षकाकडून धक्काबुक्की व कानशिलात लगावल्याचा आरोप करण्यात आला.
या घटनेमुळे श्रीरामपूरच्या प्रशासकीय वर्तुळात काही काळ खळबळ उडाली. महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घटनेचा निषेध करत कारवाईची मागणी केली. मात्र, काँग्रेस आमदार हेमंत ओगले यांनी अंगरक्षकाकडून मारहाण झाल्याचा आरोप फेटाळून लावला आहे.
श्रीरामपूर (Shrirampur) शहर व ग्रामीण भागातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, कमी दाबाने वीज मिळणे तसेच अन्य तांत्रिक अडचणींबाबत नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी ओगले यांच्या उपस्थितीत नगरपालिकेत महावितरणचे अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी कामगार, नागरिक व लोकप्रतिनिधींची बैठक झाली. यावेळी हरेगाव यात्रेदरम्यान दोन दिवस वीजपुरवठा खंडित झाल्याचा मुद्दा उपस्थित झाला.
या प्रकरणात वायरमन खरात यांच्या कामाबाबत तसेच यात्रेच्या काळात व्हॉट्सॲप ग्रुपवर एका खासगी कंपनीच्या बल्बसंदर्भातील मेसेज फॉरवर्ड केल्याबाबत बैठकीत जाब विचारण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यावरून खरात यांनी आक्षेप घेतल्यानंतर वाद वाढला. त्यांना सभागृहाबाहेर काढण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर पालिका परिसरात खरात व अंगरक्षक यांच्यात धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात आला. खरात यांनी अंगरक्षकाने कानशिलात लगावल्याचा आरोप केला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर महावितरणचे कर्मचारी (Worker) पालिकेत एकत्र आले व निषेध नोंदवत कारवाईची मागणी केली.
आमदार ओगले यांनी मात्र, हरेगाव यात्रेदरम्यान वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. याबाबत बैठकीत जाब विचारण्यात आला. व्हॉट्सॲप ग्रुपवरील मेसेजबाबतही विचारणा करण्यात आली. अंगरक्षकाने मारहाण किंवा धक्काबुक्की केलेली नाही. गर्दीत वातावरण शांत करण्याचे काम त्याने केले, असे स्पष्ट केले.
दरम्यान, खरात यांनी कोणतीही शिवीगाळ केली नसल्याचे सांगत, घटनेच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद झालेली नव्हती.
काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले यांनी, माझ्या अंगरक्षकाने संबंधित कर्मचाऱ्याला कोणतीही मारहाण किंवा धक्काबुक्की केलेली नाही. सभागृहातील वातावरण शांत करण्यासाठी त्याने हस्तक्षेप केला. गर्दीत त्यांच्यात काही झटापट झाली असेल. स्वतःची चूक लपविण्यासाठी मारहाण केल्याचा कांगावा करत रस्त्यावरही सदर कर्मचारी गोंधळ घालत होता. सदर व्यक्ती हंगामी कामगार असल्याने त्याने सरकारी बैठकीत येणे अपेक्षित नाही. त्याची पूर्ण चौकशी करून अहवाल देण्याच्या सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असे सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.