

Ahilyanagar News : अहिल्यानगर महापालिकेच्या विद्युत विभागातील कर्मचारी धीरजसिंह राजपूत उर्फ परदेशी याच्यावर मुकुंदनगर परिसरात झालेल्या प्राणघातक हल्ल्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या घटनेनंतर अहिल्यानगर महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, महापालिका कामगार युनियनने बेमुदत संपाची घोषणा केली आहे. सर्व आरोपींना अटक होईपर्यंत महापालिकेचे कामकाज बंद ठेवण्याची भूमिका युनियनने घेतली आहे.
कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजपासून महापालिका (Municipal) कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू करण्यात येणार असून, शहरातील नागरी सुविधा बंद ठेवण्यात येतील. मुकुंदनगर परिसरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून संपूर्ण सुरक्षा मिळत नाही, तोपर्यंत या भागात नागरी सुविधा पुरविण्यासाठी कोणताही कर्मचारी जाणार नसल्याचेही युनियनने स्पष्ट केले आहे.
युनियनच्या म्हणण्यानुसार, धीरजसिंह याच्यावर सात ते आठ जणांनी हल्ला केला होता. या प्रकरणात पोलिसांनी (Police) आतापर्यंत पाच जणांना अटक केली असून, काही आरोपी अद्याप फरार आहेत. उर्वरित सर्व आरोपींना अटक होईपर्यंत महापालिकेचे कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय कामगार युनियनने जाहीर केला आहे. या निर्णयामुळे शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा, स्वच्छता, विद्युत व्यवस्था आणि इतर नागरी सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल सहकार्य करण्याचे आवाहनही महापालिका कामगार युनियनने केले आहे.
महापालिका कर्मचारी शहरातील नागरिकांना विविध नागरी सुविधा पुरविण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीत काम करतात. मात्र, कामाच्या ठिकाणीच कर्मचाऱ्यांवर जीवघेणे हल्ले होत असतील, तर कर्मचाऱ्यांनी सुरक्षितपणे सेवा कशी द्यायची? असा सवाल कामगार युनियनने उपस्थित केला आहे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी महापालिका प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात आणि संवेदनशील भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आवश्यक संरक्षण द्यावे, अशी मागणी युनियनने केली आहे.
दरम्यान, धीरजसिंह राजपूत याच्या अंत्यविधीची वेळ निश्चित झाल्यानंतर महापालिका कर्मचारी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कामगार युनियनने केले आहे. कामगार युनियनचे अध्यक्ष जितेंद्र सारसर, बाबासाहेब मुदगल, सेक्रेटरी आनंदराव वायकर यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी कर्मचारी वर्गाने युनियनच्या निर्णयाचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.
धीरजसिंह याच्या मृत्यूनंतर अहिल्यानगरमध्ये या प्रकरणावरून आधीच तणावाचे वातावरण असताना आता महापालिका कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची घोषणा केल्याने शहरातील नागरी सेवांवर त्याचा काय परिणाम होणार आहे. प्रशासन या निर्णयावर काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.