Karan Sasane And Shrinivas Bihani controversy Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Karan Sasane And Shrinivas Bihani controversy : काँग्रेस अन् विखेंचा शिलेदार भिडला, भरारी पथकाचे छापे; श्रीरामपूर निवडणुकीत मतदानाच्या दिवशी राजकीय हंगामा!

Shrirampur Election Clash Between Congress & BJP Candidates, And Cash Seized : अहिल्यानगरमधील राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदु ठरलेल्या श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस अन् भाजप उमेदवारामध्ये बाचाबाची झाली.

Pradeep Pendhare

Shrirampur election news : अहिल्यानगर जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुकीत सर्वाधिक राजकीय केंद्र बनलेल्या श्रीरामपूर नगरपालिका निवडणूक मतदानाच्या दिवशी देखील जोरदार राजकीय हंगामा पाहायला मिळाला.

नगराध्यक्षपदाचे काँग्रेस उमेदवार करण ससाणे आणि भाजपचे उमेदवार श्रीनिवास बिहाणी यांच्यात वाद उफळला. या वादात काँग्रेस आमदार हेमंत ओगले यांनी उडी घेतली. याशिवाय निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने मतदानाच्या दिवशी तीन ठिकाणी छापे टाकून मतदारांना प्रलोभनासाठी देण्यात येणारी रक्कम जप्त केली.

चार वर्षांच्या प्रशासकीय कारभारानंतर श्रीरामपूर (Shrirampur) नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह 33 नगरसेवकांसाठी मतदान झाले. भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचा शिलेदार श्रीनिवास बिहाणी यांना नगराध्यक्षपदासाठी मैदानात उतरवलं होतं. काँग्रेसकडून करण ससाणे, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रकाश चित्ते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे अशोक थोरे, समाजवादी पक्षाचे जोयेफ शेख, बहुजन समाज पक्षाचे आकाश शेंडे, वंचित बहुजन आघाडीचे चरण त्रिभुवन, अपक्ष म्हणून वसंत कोल्हे आणि नीलेश भालेराव असे नऊ उमेदवार रिंगणात होते. नगरसेवकांसाठी 142 उमेदवारांनी निवडणुकीचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंदिस्त झालं. प्रभाग 3 (अ) निवडणूक 20 डिसेंबरला

मतदार यादीतील गोंधळ; मतदारांचा मनस्ताप

अनेक मतदान (Voter) केद्रांवर मतदार यादीतील अनुक्रमांकातील गोंधळामुळे मतदारांना त्रास सहन करावा लागला. बीएलओमार्फत घरपोच चिठ्ठ्या न मिळाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर आल्या. काही ठिकाणी एका बीएलओची नियुक्ती दोन ठिकाणी झाल्याचे प्रकारही उघड झाले.

बाचाबाची अन् बोगस मतदान

प्रभाग सातमध्ये कार्यकर्ते व पोलिसांमध्ये, तसेच दोन गटांमध्ये वाद झाला. पोलिसांनी यावेळी सौम्य बळाचा वापर करत परिस्थिती नियंत्रणात आणली. प्रभाग 16 मध्ये बोगस मतदान झाल्याचा आरोप काँग्रेस उमेदवाराने केला. अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे तत्काळ फौजफाट्यासह दाखल झाले. मतदानावेळी रांगेत उभ्या असलेल्या एकाला ताब्यात घेतलं; समज देऊन त्याला सोडून देण्यात आलं. आमदार हेमंत ओगले, करण ससाणे आणि श्रीनिवास बिहाणी यांच्यासह समर्थकांमध्ये वाद उफळला होता. प्रभाग 12मध्ये दोन महिला उमेदवारांच्या समर्थकांमध्ये चकमक उडाली. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वातावरण शांत झाले.

135 सीसीटीव्हीद्वारे नियंत्रण

निवडणूक निर्णय अधिकारी किरण सावंत, सहाय्यक मिलिंद वाघ व मच्छिंद्र घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली 89 केंद्रांवर काटेकोर देखरेख ठेवण्यात आली. तहसील कार्यालयातून 135 सीसीटीव्हींच्या माध्यमातून सर्व बूथवर थेट नजर होती. तक्रारी येताच तातडीने उपाययोजना करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिवसभर शहरातील विविध भागांत भेट देत, मतदानाची माहिती घेतली. आठ ठिकाणी रात्री उशिरापर्यंत मतदानासाठी मोठ्या रांगा होत्या.

भरारी पथकाची कारवाई; रोखरक्कम जप्त

भरारी पथकांनी दिवसभरात तीन ठिकाणी कारवाई करून रक्कम ताब्यात घेतली. बाजरतळ सहा हजार रूपये, भीमनगर इथून 15 हजार, सेंट झेवियर स्कूलजवळ 66 हजार, याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. दरम्यान, मोरगे वस्तीतील एका उमेदवाराची 75 हजाराची रक्कम, वॉर्ड 2 मधील एक लाख आणि डाकले महाविद्यालयाजवळ काही रक्कम लुटल्याची चर्चा शहरात सुरू होती. पोलिसांनी रात्री साडेअडीचपर्यंत गस्त वाढवून परिस्थितीवर नियंत्रण ठेवले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT