Shrirampur Water Crisis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shrirampur Water Crisis : श्रीरामपूरच्या दुष्काळाची गोष्ट! पाणीप्रश्नात 'त्या' पत्राची एन्ट्री; 178 कोटींच्या योजनेचे काम तीन महिने रखडले

Shrirampur faces water crisis with weekly supply. Opposition corporators allege letter Water Resources Secretary delayed work on Rs 178 crore water supply project three months : जलसंपदा सचिवांना पाठविलेल्या पत्रामुळे साठवण तलावाचे काम मंदावल्याचा विरोधकांचा दावा; पत्र कोणी पाठविले, नगराध्यक्षांनी मौन का बाळगले?

Pradeep Pendhare

Shrirampur 178 Crore Water Project : श्रीरामपूर शहरात आठवड्यातून एकदाच पाणी मिळत असताना नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत मात्र एका पत्राने चांगलीच खळबळ उडवली. राज्याच्या जलसंपदा विभागाच्या सचिवांना पाठविलेल्या या पत्रामुळे शहराच्या 178 कोटी रुपये खर्चाच्या नवीन पाणीपुरवठा योजनेतील साठवण तलावाचे काम तब्बल तीन महिने रखडल्याचा आरोप विरोधी नगरसेवकांनी केला.

मात्र, पत्र कोणी पाठविले, त्यामागचा उद्देश काय होता आणि त्याचा कामावर नेमका काय परिणाम झाला, या प्रश्नांवर सभागृहात स्पष्ट उत्तर मिळाले नाही. अखेर पत्राचे गूढ कायम राहिले आणि श्रीरामपूरकरांच्या पाणीप्रश्नावरही पडदा पडला नाही.

श्रीरामपूर (Shrirampur) शहराला सध्या दर बुधवारीच पाणीपुरवठा होत आहे. ऐन दुष्काळात नागरिकांना पाण्यासाठी आठवडाभर प्रतीक्षा करावी लागत असताना गुरुवारी झालेल्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत पाणीपुरवठा योजनेचा विषय चर्चेला आला. विरोधी नगरसेवक श्रीनिवास बिहाणी यांनी जलसंपदा सचिवांना पाठविलेल्या पत्राचा संदर्भ देत, या पत्रामुळे साठवण तलावाचे काम तीन महिने मंदावल्याचा आरोप केला. त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीवर परिणाम झाला का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

नगरसेवक अशीष धनवटे यांनीही या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत, संबंधित व्यक्तीचे नाव आपल्याला माहिती असल्याचे सांगितले. ते नाव सभागृहात जाहीर करू का? असा थेट सवाल त्यांनी केला. बिहाणी, धनवटे आणि जितेंद्र छाजेड यांनी हा मुद्दा लावून धरला. मात्र, काँग्रेसचे (Congress) नगराध्यक्ष करण ससाणे यांनी यावर मौन बाळगले.

मुख्याधिकारी मनोज उकिरडे यांनी माईकचा ताबा घेत, पाणीपुरवठा योजनेचे कोणतेही काम कधीही बंद नव्हते, असे स्पष्ट केले. जलसंपदा सचिवांकडे पत्रव्यवहार झाल्याची आपल्याला माहिती नाही आणि यासंदर्भात वरिष्ठांकडून कोणत्याही सूचना मिळालेल्या नाहीत, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे विरोधकांचा आरोप आणि प्रशासनाचे स्पष्टीकरण यांतून पत्राचे गूढ अधिकच वाढले.

'व्याकुळ श्रीरामपूरकर' अन् पत्राची चर्चा

विशेष म्हणजे, याच काळात साठवण तलावाच्या कामाची गती काय होती, कामात खंड पडला होता का, त्याची कारणे कोणती आणि ठेकेदाराच्या कामकाजाच्या नोंदी काय सांगतात, याची तपासणी झाल्यास वस्तुस्थिती स्पष्ट होऊ शकते. पत्राच्या कथित परिणामांबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. मात्र, आरोपांची अधिकृत पडताळणी अद्याप झालेली नाही. दरम्यान, नगरपरिषदेसमोर 'व्याकुळ श्रीरामपूरकर' या नावाने करण्यात आलेल्या आंदोलनाच्या ठिकाणीही या पत्राची चांगली चर्चा रंगली. पत्रामुळे काम रखडले आणि त्याची झळ आता शहराला बसत आहे, अशी भावना आंदोलनकर्त्यांकडून व्यक्त गेली गेली.

श्रीरामपूरकरांची अपेक्षा

पत्र कोणाचे, काम का रखडले आणि जबाबदार कोण, या तीन प्रश्नांची उत्तरे मिळण्याची श्रीरामपूरकरांना प्रतीक्षा आहे. पत्रामुळेच आज आठवड्यातून एकदा पाणी मिळते, असे अनुमान काढण्याची घाई न करता कामाच्या कालावधीचा, ठेकेदाराच्या नोंदींचा आणि प्रशासकीय पत्रव्यवहाराचा स्वतंत्र आढावा घेणे गरजेचे आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपांपलीकडे जाऊन सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्रितपणे साठवण तलावाचे काम पूर्ण करून त्यात पाणी साठविण्याची व्यवस्था करावी, एवढीच तहानलेल्या श्रीरामपूरकरांची अपेक्षा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT