Jaykumar Rawal & Shyam Saner Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Congress Politics: शाम सनेर संतापले, "जयकुमार रावल हे खोट्या केसेस करण्यात मास्टर"

Shyam Saner Politics; Public awareness campaign of Congress in the constituency against Jayakumar Rawal-शिंदखेडा मतदार संघात जयकुमार रावल यांच्या विरोधात काँग्रेसचे उद्यापासून जनजागृती अभियान

Sampat Devgire

Rawal Vs Saner News: राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त काँग्रेसने शिंदखेडा मतदारसंघात अभियान हाती घेतले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघात ही राजकीय जनजागृती सुरू करण्यात येणार आहे. या माध्यमातून काँग्रेकडून विधानसभा निवडणुकीसाठी वातावरण निम्रिती केली जाणार आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात "मोहब्बत की दुकान" अशी घोषणा केली होती. त्याचे अनुकरण शिंदखेडा मतदारसंघात काँग्रेसचे स्थानिक नेते श्याम सनेर करणार आहेत. त्यासाठी त्यांनी महात्मा गांधी जयंतीचा मुहूर्त निवडला आहे.

खासदार डॉ शोभाताई बच्छाव यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रज सरकारविरोधी आंदोलन झालेल्या चिमठाणे (शिंदखेडा) येथून या यात्रेची सुरुवात होईल. श्री सनेर यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघातील पक्षाचे सर्व पदाधिकारी त्यात सहभागी होणार आहेत.

या यात्रेचा मुख्य उद्देश भाजपचे आमदार जयकुमार रावल यांच्या विरोधात जनजागृती करणे हा आहे. या निमित्ताने पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सनेर यांनी आमदार रावल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

गेले काही दिवस काँग्रेसच्या नेत्यांनी शिंदखेडा मतदारसंघावर आपले लक्ष्य केंद्रित केले आहे. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही भाजपच्या प्रमुख नेत्यांना पक्षात प्रवेश दिला. या माध्यमातून त्यांनी आमदार रावल यांना थेट आव्हान दिले आहे.

आमदार रावल यांनाही या धोक्याची जाणीव झाली आहे. त्यामुळे सध्या आमदार रावल विकास योजनांचे भूमिपूजन आणि उद्घाटनांचे कार्यक्रम आयोजित करीत आहेत. त्या निमित्ताने पक्षाची बांधणी करण्यावर त्यांनी भर दिला आहे.

शिंदखेडा मतदार संघात आमदार रावल यांचे देखील दौरे सुरू आहेत. या दौऱ्यांना आता काँग्रेस पक्षाकडून आव्हान दिले जाणार आहे. आमदार रावल यांच्याकडून विरोधी पक्षाच्या नेते व कार्यकर्त्यांविरोधात सत्तेचा दुरूपयोग होत असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.

आमदार रावल यांनी गेल्या दहा वर्षात सत्तेचा दुरुपयोग केला आहे. कार्यकर्ते आणि विरोधकांवर पोलिसांच्या मदतीने झालेल्या असंख्य खोट्या केसेसचे ते मास्टरमाइंड आहेत. आपल्या विरोधकांना संपवण्यासाठी सबंध मतदार संघात त्यांनी दहशत निर्माण केली आहे, असा आरोप काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सनेर यांनी केला.

आमदार रावल यांच्या दहशतीला उत्तर देण्यासाठीच राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने आम्ही सबंध मतदार संघात जाऊन रावल यांची कारकीर्द आणि त्यांनी केलेली खोटी कामे लोकांपुढे मांडणार आहोत. कोणत्याही स्थितीत आमदार रावल यांची दहशत मोडून काढल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा दावा सनेर यांनी केला.

या मतदारसंघात सध्या अहंकार, जुलूमशाही आणि सरंजामशाही सुरू आहे. या सरंजामशाही विरुद्ध काँग्रेस पक्ष मतदार संघात मोहब्बत की दुकान सुरू करील, असेही श्री सनेर यांनी सांगितले.

मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री रावल हे विद्यमान आमदार आहेत. रावल यांना आपली सत्ता राखण्यासाठी यंदा विशेष धडपड करावी लागेल, असे सध्याचे चित्र आहे. मतदारसंघातील विविध सत्ता केंद्र भाजपने आपल्या ताब्यात ठेवली आहेत. त्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडून सातत्याने आव्हान दिले जात आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी आमदार रावल आणि त्यांच्या विरोधकांनी सुरू केली आहे.

या निमित्ताने काँग्रेसचे भयमुक्त शिंदखेडा आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हे अभियान चर्चेचा विषय ठरला आहे. काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक विस्तारासाठी जिल्हा अध्यक्ष सनेर यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यात आम्ही शंभर टक्के यशस्वी होऊ, असा त्यांचा दावा आहे.

--------

SCROLL FOR NEXT