Nashik Kumbh Mela : नाशिक-त्र्यंबकेश्वर मध्ये पुढील वर्षी (2027) सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. कुंभमेळा अधिक सुरक्षित, सुरळीत आणि तंत्रज्ञानाधिष्ठित करण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) व्यापक वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यात 12 कोटी भाविक येतील अशी अपेक्षा असून एका दिवशी 2.5 कोटी भाविकांची उपस्थिती राहू शकते. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर ही प्रमुख स्थळे 31 किलोमीटर अंतरावर असून 15 जून ते 30 सप्टेंबर 2027 या कालावधीत हा मेळा पार पडणार आहे. मेळाव्यात येणाऱ्या या कोट्यावधी भाविकांसाठी ‘कुंभदूत’ हा एआय आधारित डिजिटल सहाय्यक विकसित करण्यात येणार आहे. साध्या मोबाईल फोनपासून स्मार्टफोनपर्यंत सर्वांसाठी तो उपलब्ध असणार असून कुंभमेळाच्या ठिकाणांची सर्व माहिती आणि मदत हा ‘कुंभदूत’ करणार आहे.
यासंदर्भात मुंबईत नुकतीच उच्चस्तरीय कार्यशाळा पार पडली. या बैठकीत राज्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, पोलीस यंत्रणेचे अधिकारी तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रतिनिधी एकत्र आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तंत्रज्ञानाला प्रशासनाचा कणा मानत कुंभमेळा अधिक सक्षम आणि आधुनिक करण्याचा दृष्टिकोन मांडला आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही उच्चस्तरीय चर्चा सुरू असून नाशिकध्ये होणारा कुंभ 2027 हा देशातील सर्वात तंत्रज्ञान-सक्षम कुंभमेळा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
कुंभमेळ्यातील गर्दीचे व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण, आरोग्य सेवा आणि आपत्कालीन प्रतिसाद यासाठी एआयचा नेमका कसा उपयोग होऊ शकतो, यावर या बैठकीत चर्चा झाली. मेटा, गुगल, मायक्रोसॉफ्ट, एमआयटी मीडिया लॅब, भाषिनी, सोकेट.एआय, अद्या.एआय यांसारख्या आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्या आणि संस्थांचे तज्ज्ञही या चर्चेत सहभागी झाले.
‘कुंभ एआय स्टॅक’ संकल्पना
कुंभमेळा प्राधिकरणाने ‘कुंभ एआय स्टॅक’ ही संकल्पना मांडली आहे. हजारो सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन, सेन्सर्स आणि मोबाईल नेटवर्कमधील माहितीचे विश्लेषण करून तात्काळ निर्णय घेण्याची क्षमता या प्रणालीत असेल. त्यामुळे गर्दी वाढण्यापूर्वीच तिचा अंदाज घेऊन उपाययोजना करणे शक्य होणार आहे. व्हॉट्सॲप, आयव्हीआर, मोबाईल ॲप आणि सार्वजनिक घोषणांद्वारे भाविकांना मार्गदर्शन मिळणार आहे.
4000 कॅमेऱ्यांची भर पडणार
नाशिक शहरात सध्या सुमारे 1300 CCTV कॅमेरे कार्यरत असून त्यात आणखी 4000 CCTV कॅमेऱ्यांची भर पडणार आहे. यासोबतच स्मार्ट ट्रॅफिक सिस्टीम, पार्किंग व्यवस्था आणि पर्यावरणीय सेन्सर्स यांसारखी पायाभूत सुविधा आधीच उपलब्ध आहे. कुंभमेळ्यासाठी या सर्व यंत्रणांचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे.
प्रेडिक्टिव
यावेळी कुंभमेळ्याचे व्यवस्थापन ‘प्रतिक्रिया-आधारित’ (रिऍक्टिव ) न राहता ‘भविष्यवेधी’ (प्रेडिक्टिव ) करण्यावर भर देण्यात येत आहे. संभाव्य गर्दी, स्वच्छता आणि आरोग्याशी संबंधित अडचणी आधीच ओळखून उपाययोजना करण्याची क्षमता एआय प्रणालीत असेल. तसेच ‘कुंभ एआय सॅन्डबॉक्स’च्या माध्यमातून विविध तंत्रज्ञान उपायांची चाचणी प्रत्यक्ष मेळ्यापूर्वी घेण्यात येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.