Nashik Politics : सिन्नर हे नाशिक जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्रबिंद आहे. राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे व शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजे यांचा सिन्नर हा मतदारसंघ असून दोघांनीही येथे आपआपले उमेदवार दिले आहे. त्यामुळे सिन्नरची निवडणूक राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे येथील निवडणुकीच्या घडामोडी कायमच चर्चेत असतात.
न्यायालयीन प्रक्रियेमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या राज्यातील २३ नगर परिषदा व नगर पंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यपदांसाठी, तसेच विविध नगर परिषदा व नगर पंचायतींमधील १४३ सदस्यपदांच्या जागांसाठी आज, शनिवारी (दि. २०) मतदान होत आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार असून नाशिक जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकांच्या मतदानादरम्यान सिन्नर शहरात एक बोगस मतदार सापडला.
सिन्नर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 2 मधील मतदान केंद्रावर बोगस मतदाराला पोलिसांनी ताब्यात घेतलं. बनावट आधार कार्डच्या आधारे आपल्या भावाच्या जागेवर मतदान करण्यासाठी हा व्यक्ती आला होता. मतदान प्रक्रियेदरम्यान एक मतदार संशयास्पदरीत्या मतदानासाठी आल्याचे लक्षात आल्यानंतर निवडणूक कर्मचाऱ्यांनी तात्काळ चौकशी करत त्याला ताब्यात घेतलं व पोलिसांच्या स्वाधीन केलं.
कृष्णा सुनील निचळ (वय २५, रा. विजयनगर, सिन्नर) असे पकडण्यात आलेल्या बोगस मतदाराचे नाव आहे. या प्रकारामुळे काही काळासाठी संबंधित मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली होती. त्यानंतर मतदान प्रक्रिया पुन्हा शांततेत सुरु झाली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
सिन्नर नगरपरिषदेची निवडणूक लढत ही चौरंगी आहे. राष्ट्रवादी(अजित पवार गट), शिवसेना(उबाठा), शिवसेना शिंदे गट व भाजपने देखील येथे आपला उमेदवार दिला आहे. या निवडणुकीत माणिकराव कोकाटे व राजाभाऊ वाजे यांची प्रतिष्ठा पणाला लागली असल्याने सिन्नरमधील निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, ओझर आणि चांदवड या तीन नगरपरिषदेच्या एकूण सहा जागांसाठी आज मतदान होत आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सिन्नरमधल्या तीन, ओझरच्या दोन तर चांदवडच्या एका जागेसाठी आज मतदान पार पडत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.