Bharat Kokate and Seemantini Kokate Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sinnar Politics : सिन्नरमध्ये काका विरुद्ध पुतणी सामना टाळण्यासाठी प्रयत्न, कुणाचा पुढाकार?

Sinnar politics Bharat Kokate and Seemantini Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या कन्या सीमंतिनी कोकाटे व बंधू भारत कोकाटे (काका-पुतणी) यांच्यात आगामी निवडणूकीत सामना होण्याची शक्यता आहे.

Ganesh Sonawane

Nashik Politics : राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाचे नेते व क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सिन्नर तालुक्यात भाजपने केलेल्या खेळीने राजकीय समीकरण पुरते बदलले आहे. बंधू भारत कोकाटे यांच्या भाजप प्रवेशानंतर माणिकराव कोकाटेंना घरातूनच आव्हान निर्माण झाले आहे.

कौटुंबिक मतभेत असल्याने भारत कोकाटे यांनी माणिकरावांची साथ सोडली होती. आता नाशिक जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर भारत कोकाटे भाजपत गेल्याने माणिकराव कोकाटेंची मोठी अडचण झाली आहे. विशेषत : त्यांची लेक सीमंतिनी कोकाटे यांच्या राजकीय वाटचालीत भारत कोकाटे यांचा मोठा अडसर निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.

पुतणी सीमंतिनी कोकाटे व काका भारत कोकाटे दोघेही निवडणुकीसाठी सोमठाणे गटातून इच्छुक आहेत. तब्बल दोन वर्षांपासून भारत कोकाटे या गटातून निवडणुकीसाठी तयारी करत आले आहे. तर, माणिकराव कोकाटेंची कन्या सीमंतीनी या देखील याच गटातून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याने काका-पुतणीतील सामना अटळ असल्याचे बोलले जात आहे.

परंतु आता काका पुतणीत सामना नको म्हणून त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी पुढाकार घेतल्याची माहिती समजते. काका-पुतणीतील सामना टाळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कौटुंबिक कलह होऊ नये म्हणून जवळच्या नातेवाईकांकडून दोघांनाही वेगवेगळ्या गटातून लढण्याचा सल्ला दिला जातो आहे.

सीमंतीनी कोकाटे यांचा बालेकिल्ला असलेला सोमठाणे गट नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. मात्र, भारत कोकाटे हे सोमठाणे गटातून इच्छुक असल्याने त्यांना त्या गटातून निवडणूक लढू द्यावी. तर, सीमंतीनी यांनी सर्वसाधरण महिला राखीव असलेल्या मुसळगाव गटातून निवडणूक लढावी असा सल्ला दिला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुसळगाव गटात विरोधकांकडे सक्षम उमेदवार नसल्याने त्या गटातून सीमंतिनी यांना उमेदवारी दिल्यास त्यांचा निवडून येण्याचा मार्ग अधिक सुकर होईल. तर इकडे सोमठाणे गटात भारत कोकाटे यांचाही मार्ग मोकळा होईल. त्यातून कौटुंबिक कलह टाळता येईल असा प्रयत्न आहे. दरम्यान आता काका-पुतणी काय निर्णय घेतात याकडे अवघ्या सिन्नर तालुक्याचे लक्ष्य लागून आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT