Chhagan Bhujbal, Dada Bhuse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan BhujbalNews : भुजबळांच्या मंत्रिपदाने बदलणार राजकीय समीकरणे?

NCP News : नाशिक विभागाला सध्याच्या सरकारमध्ये सर्वाधीक सहा मंत्रीपदे मिळाली

Sampat Devgire

डॉ. राहुल रनाळकर

Nashik NCP News : नाशिक जिल्ह्याला छगन भुजबळ यांच्या रूपाने पुन्हा एकदा मंत्रिपद मिळाले आहे. महाविकास आघाडी हा तीन पक्षांचा पहिला प्रयोग शरद पवार यांनी राज्यात केला. आता त्याची पुनरावृत्ती देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. दादा भुसे नाशिकमधील एकमेव मंत्री सध्याच्या सरकारमध्ये होते. आता मंत्र्यांची संख्या दोन झाली आहे. शिवाय सध्याचे पालकमंत्री दादा भुसे आणि दोन माजी पालकमंत्री म्हणजेच छगन भुजबळ आणि गिरीश महाजन यांचे विशेष लक्ष नाशिकवर राहणार आहे.

उत्तर महाराष्ट्रात नाशिकच्या (Nashik) तुलनेत जळगाव (Jalgaon) अधिक हेविवेट झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील कॅबिनेट मंत्र्यांची संख्या तीन अर्थात, नाशिकच्या पुढे गेली आहे. सर्वाधिक कॅबिनेट मंत्र्यांचा विभाग म्हणूनही उत्तर महाराष्ट्राचा निश्चितपणे दबदबा असेल. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात फूट पडल्यानंतर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) देखील मंत्री झाले आहे.

विजय गावित यांच्यासह तब्बल सहा कॅबिनेट मंत्रिपदे उत्तर महाराष्ट्राच्या वाट्याला आली आहेत. मंत्रिपदाचा आणि राज्य सरकारचा उर्वरित कालावधी कमी असला तरी छाप सोडण्याइतपत कामगिरी सहाही मंत्र्यांना निश्चितपणाने करावी लागणार आहे. किंबहूना हे त्यांच्यासमोरील सर्वांत मोठे लक्ष्य आणि आव्हान असेल.

तीन पक्षांचं सरकार चालवणं ही तशी सोपी गोष्ट नाही. सरकार चालवणं कदाचित तुलनेनं सोपं ठरेल, पण आगामी निवडणुकांना सामोरं जाणं या तिन्ही पक्षांसाठी अत्यंत बिकट ठरणार आहे. निवडणुकांची समीकरण जुळवणं हे अधिक किचकट काम असेल. कोणाविरुद्ध कोण लढेल आणि ते कोणत्या तिकिटावर हे सगळेच अनिश्चित आहे. अगदी उदाहरणादाखल सांगायचं, तर छगन भुजबळ शिवसेनेसाठी नांदगाव विधानसभा सोडतील का, हा एक बिकट प्रश्न आहे. तिथे सध्याच्या घडीला सुहास कांदे यांनी चांगलाच जम बसवला आहे. लोकांच्या मनातही त्यांनी स्थान मिळवले आहे.

अगदी बंडखोरी करूनही नांदगाव पुन्हा मिळवणे भुजबळांना अवघड जाणार आहे. येवला हा भुजबळांचा बालेकिल्ला मानला जातो. तिथे रणनीती म्हणून भाजपने अमृता पवार यांना तयारी करण्याचे संकेत दिले होते. मात्र आता अमृता पवार यांची भूमिका काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. येवल्यात अमृता पवार किंवा संभाजी पवार उमेदवार असू शकतात. तर भुजबळांविरुद्ध अन्य असा सामना इथे रंगेल. पण या सगळ्यात महत्त्वाचे निर्णय हे पक्षाचे उच्चस्तरीय नेते घेत असल्यामुळे हेविवेट असलेले भुजबळ अन्य पक्षांतील मैत्रीतून काही निर्णय निश्चितपणाने फिरवू शकतात. विरोधकही ही बाब जाणून आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस कमकुवत होण्याचा फायदा शिवसेनेच्या ठाकरे गटाला अधिक होण्याची शक्यता दिसते. तर सरकारमधील राष्ट्रवादीच्या प्रवेशामुळे शिवसेना शिंदे गट धास्तावला आहे. आमदारांमधील चलबिचल त्यांना पुन्हा ठाकरे गटाकडे खेचू शकते. सध्या सत्तेतील तीन पक्ष विरुद्ध विरोधातील तीन पक्ष हे एकत्रित निवडणूक लढवतील की नाही, हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र तिघे विरुद्ध तिघे अशी स्थिती सार्वत्रिक असण्याची शक्यता आहे. त्यात बंडखोरांचे आव्हान प्रस्थापित नेत्यांना पेलावे लागेल. जशी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल लोकांमध्ये सहानुभूतीची भावना आहे, तशीच सहानुभूती शरद पवार यांच्यासंदर्भात निश्चितपणाने लोकांमध्ये आहे.

आता राहता राहिला प्रश्न पालकमंत्री पदाचा. छगन भुजबळ आक्रमक नेतृत्व आहे. त्यामुळे पालकमंत्री पद त्यांना निश्चितपणाने हवे असेल, हे सर्वश्रुत आहे. तथापि, लगेचच असा बदल होण्याची शक्यता दिसत नाही. शिवाय विद्यमान पालकमंत्री दादा भुसे यांच्याशी भुजबळ यांची चांगली मैत्री आहे. जी माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी कधीच नव्हती. सध्या मात्र तिघा नेत्यांना मैत्रीची संधी चालून आलेली आहे. हिरे विरोध हा भुजबळ-भुसे मैत्रीचा समान धागा आहे. आता नेमकं काळाच्या उदरात काय दडलंय, याचा अंदाज घेण्याचा सगळे नेते प्रयत्न करत असताना फार उलथापालथी झाल्यास चित्र पुन्हा वेगाने बदलू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT